निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या बँकिंग, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली. जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि त्यापरिणामी निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामुळे मंदीवाल्यांची सरशी झाली.
काल दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९३.७० अंशांनी घसरून ६२,४२८.५४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २६३.१ अंश गमावत ६२,३५९.१४ अंशांच्या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४६.६५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,४८७.७५ पातळीवर स्थिरावला. जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हाने असूनही, देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेने सरलेल्या चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) ६.१ टक्के वाढ नोंदवली. अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारीमुळे आठवडाभरात बाजारात उत्साही वातावरण कायम होते. मात्र दुसरीकडे अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाढवल्यानंतर अमेरिकेत चलनवाढीचा दबाव वाढेल या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
हेही वाचाः जीएसटी संकलनात मोठी वाढ; १.५७ लाख कोटींचा टप्पा पार
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल आणि कोटक महिंद्र बँक यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि मारुतीचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, सन फार्मा, नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीत होते.
हेही वाचाः यूपीआयच्या माध्यमातून १४.३ लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार
सेन्सेक्स ६२,४२८.५४ -१९३.७० (-०.३१)
निफ्टी १८,४८७.७५ ४६.६५ ( -०.२५ )
डॉलर ८२.४२ -३३
तेल ७२.४८ -०.१७