मुंबई : घसरणीने सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी गुरुवारच्या (२३ जानेवारी) सत्रअखेर पुन्हा सकारात्मक बंद नोंदवला. सोमवारच्या धडाम् आपटीनंतर, सेन्सेक्स-निफ्टीच्या हे सलग दुसरे वाढीचे सत्र ठरले. मात्र गेल्या दोन दिवसांच्या विपरित गुरुवार हा मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्ससाठी सुदिन ठरला आणि यातील काही शेअर्सचे भाव मोठी उसळी घेताना दिसून आले.
गुरुवारी सत्रारंभी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात खुले झाले. सेन्सेक्स १३४ अंशांच्या तोट्यासह ७६,३०० खाली, तर निफ्टी ५२ अंशांच्या नुकसानीसह २३,१०० खाली रोडावत खुले झाले होते. मात्र १० वाजण्याच्या सुमारास बाजारात वाढलेल्या खरेदीने दोन्ही निर्देशांकांनी सकारात्मक वळण घेतले, जे बाजारातील व्यवहाराची वेळ संपेपर्यंत कायम टिकून राहिले.
अखेर सेन्सेक्स ११५.३९ अंशांनी (०.१५%) वाढून ७६,५२०.३८ पातळीवर, तर निफ्टी ५०.०० अंशांच्या (०.२२%) वाढीसह २३,२०५.३५ वर स्थिरावला.
गुरुवारच्या व्यवहारांचे वैशिष्ट्य म्हणजे सेन्सेक्स जरी आखूड पट्ट्यात हालचाल करताना दिसले, तरी मोठ्या चढ-उतारांसह शेअर बाजारातील अस्थिरता बव्हंशी कमी झाली आहे. बाजारातील नकारात्मकता कमी होत चालल्याचे हे द्योतक असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. शेअर बाजाराच्या मूडपालटाची कारणे काय?
१. ट्रम्प धोरणांबाबत तूर्त दिलासा : व्यापार करांच्या आघाडीवर जशी भीती व्यक्त केली जात होती तशी विशेषतः चीनबाबत ट्रम्प प्रशासनाची दिसून न आलेली आक्रमकता आणि दुसरीकडे कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाबाबत त्यांच्या आश्वासक घोषणेने बुधवारीही स्थानिक शेअर बाजारात मोठे दिलासादायी प्रतिबिंब उमटले होते. दीर्घावधीसाठी चिंतांचे सावट कायम असले, तरी वरील बाबींनी बाजाराला तूर्त हायसे वाटावे असा आधार दिला आहे.
२. डॉलरला तात्पुरते वेसण : मागील दोन दिवसांत अमेरिकी डॉलरची झळाळी काही झाकोळली आहे. जगाला हादरे देणाऱ्या ट्रम्प प्रशासनाच्या ठोस धोरण धडाक्यांच्या अभावी तेथील चलनाला बसलेली ही वेसण, भारतीय रुपयासह जगातील प्रमुख चलनांसाठी दिलासादायी ठरली आहे. बुधवारच्या सत्रात रुपया तब्बल २३ पैशांच्या मजबुतीसह प्रति डॉलर ८६.३५ पातळीवर स्थिरावला. खनिज तेलाच्या किमतीतील भडका गेल्या दोन दिवसांत थंडावत जाण्याचे गुंतवणूकदारांसाठी सुखद ठरले.
३. सरस तिमाही निकालांनी स्फुरण : अल्प असली तरी झालेली कर्जवाढ आणि पतमालमत्तेच्या गुणवत्तेत सुधार या बाबी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेच्या तिमाही निकालाच्या अंगाने बाजाराच्या पसंतीस उतरल्या. त्याचप्रमाणे तिमाहीत १५ टक्के नफावाढीची कामगिरी दर्शविणाऱ्या पर्सिस्टंट सिस्टीम्सची कामगिरी, कोफोर्जची ६.६ टक्के नफावाढ, त्याचप्रमाणे हिंदुस्तान युनिलिव्हरची तिमाही कामगिरीही विश्लेषकांच्या अपेक्षेनुरूपच राहिली.
४. अर्थसंकल्पाबाबत आशावाद : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने, सरकारी भांडवली खर्चात (Capex) वाढ, वित्तीय तुटीच्या (Fiscal Deficite) मर्यादेचे पालन आणि प्राप्तिकरात संभाव्य सवलती या अर्थसंकल्पाकडून प्रमुख अपेक्षा आहेत
५. दमदार खरेदीने मिडकॅप्सची २% मुसंडी : मागील दोन दिवसांत सपाटून मार खाल्लेले मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सचे भाव गुरुवारी झालेल्या खरेदीने कलाटणी दर्शवत मोठी उसळी घेताना दिसले. माझगांव डॉक, कोचीन शिपयार्ड, पर्सिस्टंट सिस्टीम्स, कोफोर्ज, सुप्रिया लाइफसायन्सेस, आयटी, ऑटो, दूरसंचार क्षेत्रातील अनेक समभागांचे भाव त्यामुळे चांगलेच वधारले. वरच्या स्तरावर नफावसुली झाली असली तरी, जानेवारीपासून तब्बल नऊ टक्क्यांच्या आसपास गडगडलेला बीएसई मिडकॅप निर्देशांक पावणे दोन टक्क्यांनी वधारला.