Stock Market Updates, Monday 2 September 2024: मुंबई शेअर बाजारातील आकड्यांवर तमाम गुंतवणूकदार डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून असतात. शेअर बाजार अगदी काही अंकांनी जरी खाली आला, तरी गुंतवणूकदारांचं अक्षरश: शेकडो कोटींचं नुकसान होतं. पण तोच शेअर बाजार थोडा जरी वर गेला, तरी शेकडो कोटींचा फायदाही गुंतवणूकदारांच्या पदरी पडतो. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारानं असंच गुंतवणूकदारांच्या पदरात मोठ्या नफ्याचं दान टाकलं! बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं आजपर्यंतच्या सर्वोच्च कामगिरीची नोंद केली.
सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सनं शुक्रवारच्या क्लोजिंगवर घसघशीत वाढ नोंदवली. शुक्रवारी सकाळी ८२,६३७ अंकांचा उच्चांक नोंदवणारा सेन्सेक्स बाजार बंद झाला तेव्हा ८२,३५० वर होता. सोमवारी आपली ही कामगिरीही मागे सारत Sensex नं थेट ८२,७२५.२८ अंकांपर्यंत मजल मारली. त्यामुळे शुक्रवारचा विक्रमही सेन्सेक्सनं सोमवारी बाजार सुरू होताच मोडीत काढला.
Nifty50 चीही विक्रमी घोडदौड
सेन्सेक्सनं आपलाच आधीचा उच्चांक मोडल्यानंतर निफ्टीनंही पावलावर पाऊल ठेवत नवा उच्चांक नोंदवला. सोमवारी बाजार उघडल्यानंतर निफ्टी ५० नं थेट २५,३३३.२८ अंकांवर झेप घेतली. सलग १२ सत्रांमध्ये सातत्याने निफ्टीनं वाढ नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी निफ्टीनं सलग ११ वेळा वाढ नोंदवत १७ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती.
BSE: बाजार रंग : चाचणी परीक्षा आणि कंपन्यांचा अभ्यास
अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतातील विदेशी गुंतवणूक वाढण्यासंदर्भात आशादायी वातावरण निर्माण झालं असून त्यामुळेच मुंबई शेअर बाजारात हे उच्चांक गाठले जात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नव्या उच्चांकांचे भागीदार…
सेन्सेक्स व निफ्टीच्या आजच्या कामगिरीत बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, आयटीसी, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि एशियन पेंट्स यांच्या शेअर्सनं मोठी भूमिका निभावली. पण त्याचवेळी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी व भारती एअरटेल यांचा प्रवास उलट्या दिशेनं पाहायला मिळाला. ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीव्हीएस मोटर्सनं ऑगस्टमध्ये दुचाकींची विक्री १३ टक्क्यांनी वाढल्याचं नमूद केलं असून हिरो मोटोकॉर्प्सची विक्रीही ५ टक्क्यांनी वाढली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd