भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी लावलेला जोर आणि चौखूर उधळलेल्या बैलाने सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात नवीन विक्रमी उच्चांक बंद स्तर नोंदवला. बाजारातील विदेशी गुंतवणुकीचा मजबूत प्रवाह आणि जागतिक बाजारांतील तेजीच्या इंधनामुळे सेन्सेक्सने मागील चार सत्रांत २,३०० अंशांची कमाई करून ऐतिहासिक ६५ हजारांपुढे झेप घेण्याचे बळ दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि एचडीएफसी जोडगोळीसह प्रमुख निर्देशांकातील सामील बड्या समभागांच्या खरेदीमुळेही निर्देशांकांच्या घोडदौडीला गती दिली. परिणामी सोमवारी सलग चौथ्या सत्रात मोठी वाढ साधत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८६.४९ अंशांनी (०.७५ टक्के) वाढून ६५,२०५.०५ या सार्वकालिक उच्चांकावर बंद नोंदवला. दिवसभरात तो ५८१.७९ अंशांची भर घालत ६५,३००च्या शिखर पातळीला गवसणी घालणाऱ्या उच्चांकावर पोहोचला होता. गुंतवणूकदारांच्या व्यापक उत्साहाचे प्रतिबिंब म्हणजे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. ऊर्जा ते वित्तीय क्षेत्र ते ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांतील समभागांमध्ये झालेल्या जोमदार खरेदीने निफ्टीला नवीन शिखर गाठायला ऊर्जा पुरवली. परिणामी सोमवारी १३३.५० अंश (०.७० टक्के) भर घालून, १९,३२२.२५ या विक्रमी उच्चांकावर निफ्टी बंद झाला. दिवसांतर्गत व्यवहारात १५६.०५ अंश मुसंडीसह या निर्देशांकाने १९,३४५.१० अशा सार्वकालिक शिखरावर फेर धरला होता.

जूनमधील मजबूत जीएसटी संकलनाने बाजाराची विक्रमी घोडदौड कायम राखली आणि गेल्या काही दिवसांत देशातील बहुतांश भाग व्यापून राहिलेल्या पर्जन्यमानाने गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणित केला. मात्र मजल दर मजल नवीन उच्चांकी विक्रमाकडील ही दौड मुख्यतः परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला निधीचा मजबूत प्रवाहाच्या परिणामी सुरू आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची सुस्थिती दर्शवणाऱ्या बहुतांश मापदंडांची चांगली कामगिरी पाहता नजीकच्या काळात बाजारातील हा निधीचा प्रवाह अधिक बळकट होऊ शकतो, असे मत कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे संशोधन प्रमुख श्रीकांत चौहान यांनी व्यक्त केले. सेन्सेक्सच्या चढत्या आलेखात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाचे २.५३ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक योगदान राहिले, त्यानंतर आयटीसी, बजाज फायनान्स, स्टेट बँक, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि आयसीआयसीआय बँक असा वधारलेल्या समभागांचा क्रम राहिला. त्या उलट, पॉवर ग्रिड, मारुती, लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र, नेस्ले आणि टाटा मोटर्स हे समभाग घसरणीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील तब्बल १,९७२ समभागांचे मूल्य वाढले तर १,७२१ घसरणीत आणि १४७ समभागांचे मूल्य अपरिवर्तित राहिले. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.५६ टक्क्यांनी आणि ०.३० टक्क्यांनी वाढले.

हेही वाचाः देशातल्या २ हजारांच्या ७६ टक्के नोटा बँकांमध्ये जमा; ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची संधी

जागतिक बाजारात चैतन्याचे प्रतिबिंब

गुंतवणूकदारांच्या भावनांना देशांतर्गत दमदार अर्थ आकडेवारी आणि आशावादी जागतिक संकेतांमुळे बळकटी मिळाली. मंदीची शक्यता टाळून जागतिक बाजाराला आवश्यक ते स्फुरण अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीने दिले. फेडरल रिझर्व्हला अमेरिकेतील चलनवाढीचा दरात नरमाई येण्याची चिन्हे दिसत असून, ही बाब जागतिक महासत्तेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायी आणि जागतिक भांडवली बाजारासाठी उत्साहदायी ठरली. परिणामी, शुक्रवारच्या व्यवहारात अमेरिकी बाजार लक्षणीयरीत्या वाढ साधताना दिसून आले. त्याचेच अनुकरण सोमवारी पहाटे खुले झालेल्या आशियाई बाजारांमध्ये तेजीपूरक चैतन्य दिसून आले, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचाः मोदी सरकार आता ‘या’ सरकारी बँकेतील ४९ टक्के भागीदारी विकणार; क्रेडिट कार्ड व्यवसायावर परिणाम होणार

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex tops 65 thousand for first time earning 2300 marks in four semesters vrd
Show comments