Share Market Opening on 9 October : पश्चिम आशियामध्ये हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम व्यापक होत चालला आहे. या हल्ल्यानंतर प्रथमच आज खुल्या झालेल्या भारतीय शेअर बाजारात सुरुवातीलाच घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या घसरणीसह व्यापार करीत आहेत.
सेन्सेक्स ४७० हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. सकाळी ९:२० वाजता सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला होता आणि ६५,५०० अंकांच्या खाली व्यवहार करीत होता, तर निफ्टी सुमारे १७० अंकांनी घसरला होता आणि १९,४८५ अंकांच्या खाली होता.
हेही वाचाः शहरे आणि नगरांच्या परिवर्तनासाठी २०१४ पासून १८ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक : हरदीप एस पुरी
बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे
शेअर बाजार उघडण्यापूर्वीच्या सत्रातच बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत होती. आधीच्या सत्रात सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला होता, तर निफ्टी देखील सुमारे १ टक्क्यांनी घसरला होता. निफ्टी फ्युचर्स जवळपास ३० अंकांनी घसरला. या सर्व संकेतांमुळे बाजाराची सुरुवात तोट्याने होऊ शकते.
हेही वाचाः २००० रुपयांच्या नोटेबाबत RBI गव्हर्नरांचे मोठे वक्तव्य, दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
मागील आठवडा संमिश्र होता
देशांतर्गत बाजारासाठी मागील आठवडा संमिश्र ठरला. बाजारात सुरुवातीला घसरण दिसून आली, तर शेवटच्या दोन दिवसांत बाजाराने पुनरागमन करण्यात यश मिळवले. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स सुमारे ३६५ अंकांनी मजबूत झाला आणि ६६ हजार अंकांच्या जवळ बंद झाला. त्याचवेळी निफ्टीने सुमारे ११० अंकांची उसळी घेत १९,६५५ अंकांच्या जवळ पोहोचला होता.
जागतिक बाजारात संमिश्र कल
जागतिक बाजारात संमिश्र कल आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार नफ्यात होते. डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी ०.८७ टक्क्यांनी वाढली. NASDAQ कंपोझिट इंडेक्समध्ये १.६० टक्के आणि S&P ५०० मध्ये १.१८ टक्के रॅली होती. शुक्रवारी अमेरिकन बाजार बंद झाल्यानंतर इस्रायलवर हमासचा हल्ला झाला, त्यामुळे अमेरिकन बाजाराची प्रतिक्रिया आजच समजणार आहे. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारात संमिश्र कल आहे. जपानचा निक्केई ०.२६ टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगच्या हँग सेंगमध्ये वादळाचा इशारा दिल्यानंतर बाजार मध्यभागी बंद करण्यात आला आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात मोठे समभाग घसरले
आजच्या व्यवहारात बहुसंख्य मोठ्या समभागांची सुरुवात खराब झाली आहे. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग रेड झोनमध्ये उघडले. सुरुवातीच्या सत्रात केवळ एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्राचे समभाग ग्रीन झोनमध्ये आहेत. दुसरीकडे टाटा स्टील आणि एनटीपीसीमध्ये २-२ टक्क्यांहून अधिक घसरण आहे. जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांसारखे शेअर्सही मोठ्या तोट्यात आहेत.