मुंबई : अमेरिका आणि रशियादरम्यान युक्रेनवरून वाढता तणाव आणि जागतिक बँकांकडून पुन्हा निर्माण झालेल्या व्याजदर वाढीचा धोका या प्रतिकूल घटनांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ९२७ अंशांची घसरण झाली आणि त्याने तीन आठवड्याची निचांकी पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने चार महिन्यांतील निचांकी स्तर गाठला.
जागतिक पातळीवरून मिळणारे प्रतिकूल संकेत आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी जगभरातील गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९२७.७४ अंशांनी म्हणजेच १.५३ टक्क्यांनी घसरून ५९,७४४.९८ पातळीवर विसावला. विद्यमान फेब्रुवारी महिन्यातील ही सेन्सेक्सची निचांकी पातळी आहे. दिवसभरात त्याने ९९१.१७ अंश गमावत ५९,६८१.५५ ही सत्रातील निचांकी पातळी गाठली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २७२.४० अंशांची (१.५३ टक्के) घसरण झाली आणि तो १७,५५४.३० पातळीवर स्थिरावला. निफ्टी चार महिन्यांच्या निचांकी पातळीवर बंद झाला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या पुनरुत्थानामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हा अल्पकालीन परिणाम असला तरी रशियावरील निर्बंधांची भीती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर, विशेषत: अन्नधान्य आणि तेलाच्या निर्यातीवर परिणाम होण्याचा धोका वाढतो आहे. भांडवली बाजार करोना महासाथीच्या परिणामांपासून सावरतो आहे. मात्र दुसरीकडे वाढती महागाई आणि ती कमी करण्यासाठी जागतिक मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीच्या आक्रमक धोरणाने बाजार वाढीला रोखले आहे. युद्ध हे आर्थिक आघाडीवर लढले जाण्याची शक्यता असून त्याचा अमेरिका आणि भारतासारख्या मजबूत अर्थव्यवस्थांवर मर्यादित प्रभाव पडेल. अमेरिकी मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँकेचे पतधोरणा समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. केवळ आयटीसीचा समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स ५९,७४४.९८ – ९२७.७४ -१.५३ टक्के
निफ्टी १७,५५४.३० – २७२.४० -१.५३ टक्के
डॉलर ८२.८९ +१०
तेल ८२.११ -१.११