मुंबई :  सलग आठव्या सत्रात तेजी नोंदविताना सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशाक गुरुवारी नव्या विक्रमी टप्प्यावर विराजमान झाले. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला समभाग खरेदीचा सपाटा आणि देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांच्या जोरावर निर्देशांकांची उच्चांकी घोडदौड सुरूच आहे. तीन महिन्यांच्या उच्चांकी पोहोचलेला निर्मिती क्षेत्रातील ‘पीएमआय’ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्याने निर्देशांकांना अधिक चालना मिळाली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८४.५४ अंशांनी वधारून ६३,२८४.१९ या नवीन उच्चांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात ४८३.४२ अंशांची मजल मारत तो  ६३,५८३.०७ या सर्वोच्च शिखरापर्यंत झेपावला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ५४.१५ अंशांची कमाई केली आणि तो १८,८१२.५० या पातळीवर स्थिरावला.

देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी आशादायक आकडेवारी आणि जागतिक बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत आघाडीवर तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला आहे. तसेच मध्यवर्ती बँकेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेने ६.३ टक्के दराने विकास साधला. जागतिक बाजारांची दिशा ठरविणाऱ्या अमेरिकी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनीदेखील आगामी व्याजदर वाढ आधीच्या तुलनेत सौम्य राहण्याच्या दिलेल्या संकेतामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

गुंतवणूकदारांच्या झोळीत श्रीमंती!

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरणामुळे अस्थिर बनलेला भांडवली बाजार सावरला आहे. ५३,५०० अंशांच्या शिखरावर विराजमान झालेल्या सेन्सेक्समुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदार सलग आठ सत्रांतील तेजीमुळे ९ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले.

Story img Loader