SIP Investment In India: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सतत होणाऱ्या घसरणीमुळे करोडो गुंतवणूकदारांना याचा फटका बसला आहे. यामुळे गुंतवणूकदार एसआयपी सह विविध प्रकारची त्यांची गुंतवणूक काढून घेत आहेत. अशात अनुभवी गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी नवीन गुंतवणूकदारांना, विशेषतः सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांबाबत मोठं भाष्य केले आहे.

त्यांनाही भोगू द्या

इंडिया टुडे नेटवर्कशी नुकत्याच साधलेल्या संवादात, शर्मा यांनी सध्याच्या बाजारातील अस्थिरता आणि गेल्याकाही महिन्यांपासून होणाऱ्या एकूण घसरणीबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी नवीन गुंतवणूकदार सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधून (SIP) बाहेर पडत असल्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले “शेअर मार्केटचा खेळ अशा प्रकारेच चालतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही जे भोगलं आहे ते त्यांनाही भोगू द्या.”

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नव्या गुंतवणूकदांवरही झाला आहे. कारण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत असलेल्या एसआयपी गुंतवणुकीमध्ये मोठी घट होताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स १३% नी घसरला आहे, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे २२% आणि २५% ने घसरले आहेत.

आम्हीही कधीतरी लहान होतो

शेअर बाजारातील वेदना सहन करण्याची त्यांची क्षमता लहान गुंतवणूकदारांपेक्षा खूप जास्त आहे, असे त्यांना सांगण्यात आले तेव्हा शर्मा म्हणाले की, “आम्हीही कधीतरी लहान होतो. आम्ही कधीही रडलो नाही म्हणून आज आम्ही मोठे झालो. आम्ही त्याचा सामना केला, त्यातून बाहेर पडलो आणि अडचणींवर मात केली. या लोकांनाही तेच करावे लागेल.” दरम्यान शंकर शर्मा हे अनुभवी गुंतवणूकदार आणि जीक्वांट इन्व्हेस्टेक या वेल्थ मॅनेटमेंट फर्मचे प्रमुख आहेत.

नितीन कामथ यांचे एसआयपीबाबत मत

काही दिवसांपूर्वी झेरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांना मोठा सल्ला दिला होता. त्यांनी ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करणे थांबवणे अयोग्य ठरेल असे म्हटले होते.

कामथ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये “एसआयपी थांबवणे चुकीचे आहे”, असे म्हटले होते. त्यांच्या मते, दर महिन्याला गुंतवणूक करून आपण निराश होण्याऐवजी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. कामथ म्हणाले की, सध्याची शेअर बाजार सुधारणा (करेक्शन) ही कोरोनानंतरच्या गुंतवणूकदारांसाठी पहिली मोठी सुधारणा (करेक्शन) आहे आणि ती स्वाभाविक आहे.

Story img Loader