सुधीर जोशी

भांडवली बाजारातील बहुतांश सुचिबद्ध सर्व कंपन्यांचे सहामाही निकाल आले आहेत आणि बाजाराला दिशा देणाऱ्या कुठल्याच घटना न घडल्यामुळे सरलेल्या सप्ताहात बाजाराची चाल मंद होती. पण अशा उदासीन असलेल्या बाजारात बँक निफ्टीने मात्र सातत्याने आघाडी घेत नवीन उच्चांकी पातळी गाठली. सरकारी व काही निवडक खासगी बँकांमध्ये दमदार खरेदी झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध झाले. त्यातील सकारात्मक संकेतामुळे सप्ताहअखेर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टीने जोर पकडला. बाजाराचे हे दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी स्तरावर सप्ताहअखेर बंद झाले. बिसलेरीचा व्यवसाय टाटा कन्झ्युमरकडे हस्तांतरित करण्याचा विचार होत असणे व आरती इंडस्ट्रीजचा अमोनियम नायट्रेटसाठी दीपक फर्टिलायझर सोबतचा दीर्घ मुदतीचा करार या सरलेल्या सप्ताहातील बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना ठरल्या. या सदरामध्ये आधी सुचविलेल्या या दोन्ही कंपन्यांच्या भविष्यासाठी या चांगल्या घटना ठरतील.

ग्राईंडवेल नॉर्टन:

उद्योगांना लागणारी ग्राईंडिंग, कटिंग, पॉलिशिंगची चाके व सिलिकॉन कार्बाईड ही कंपनी बनविते. कारखानदारी उद्योगांना लागणारे उच्च दर्जाचे प्लास्टिक आणि सिरॅमिक्सचे सुटे भागही कंपनी बनविते. कंपनीला जगातील नावाजलेल्या नॉर्टन समूहाचे पाठबळ आहे. कंपनीने सप्टेंबरअखेर संपलेल्या सहा महिन्यांत आकर्षक कामगिरी केली. कंपनीची उलाढाल १,२७० कोटी रुपयांवर तर नफा १८३ कोटींवर पोहोचला आहे. सरलेल्या वर्षात कंपनीने दोन हजार कोटींची उलाढाल आणि २९६ कोटींचा नफा नोंदवला होता. मार्च २०२३ अखेर संपणाऱ्या वर्षात कंपनी २,४०० कोटींची उलाढाल करून ३६० कोटींचा नफा मिळवेल अशी आशा आहे. कंपनीची रोकड तरलता चांगली असून वार्षिक नफ्यामध्ये सरासरी २० टक्के वाढ होत आहे. सध्या १,९३० रुपयांच्या पातळीवर हे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत.

केईआय इंडस्ट्रीज:

भारतातील सर्वात मोठ्या केबल व वायर उत्पादकांपैकी ही एक कंपनी आहे. कंपनी अतिउच्चदाब व ताण सहन करू शकणाऱ्या पॉवर केबल्स आणि वायर बनविते. या उत्पादनांना वीजपुरवठा, रेल्वे, रिफायनरी, बांधकाम अशा पायाभूत उद्योगांकडून मागणी असते. सप्टेंबरअखेर तिमाहीत कंपनीच्या विक्रीमध्ये २० टक्के वाढ झाली, मात्र उत्पादन घटकांच्या वाढलेल्या किमतीमुळे कंपनीचा खर्च वाढला. शिवाय उच्च दाबाच्या केबलमधील मागणी कमी झाल्यामुळे नफा साधारणपणे त्याच पातळीवर राहिला. कंपनीचे या व्यवसायातील अग्रणी स्थान, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील खासगी प्रकल्पातील वाढ लक्षात घेता कंपनीने आतापर्यंत नफ्यामध्ये साधलेली सरासरी २६ टक्के वाढ पुढे देखील कायम राहील, अशी अपेक्षा आहे. समव्यावसायिक कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे समभाग सध्या वाजवी पातळीवर मिळत आहेत. १,५३० ते १,५७० रुपयांच्या पातळीत खरेदीची संधी आहे.

सीमेन्स:

भारतातील अभियांत्रिकी, उर्जा व्यवस्थापन, आरोग्याशी निगडित तंत्रज्ञान, स्वयंचलित आणि नियंत्रित यंत्रणा (ऑटोमेशन व कंट्रोल), रेल्वे सिग्नलिंग व सुरक्षा प्रणाली अशा अनेक उच्च तांत्रिक सेवा देणाऱ्या या कंपनीने सप्टेंबरअखेर समाप्त आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले. (कंपनीने करोनापूर्व काळाची व्यवसाय पातळी गाठली आहे. कंपनीकडे १३,५०० कोटी रुपयांच्या मागण्या आहेत.) कंपनीने नुकताच रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी कारखाना सुरू केला आहे. त्यामधून भारतातील व परदेशातील मागणीचा पुरवठा कंपनी करणार आहे. सरकारी व खासगी भांडवली प्रकल्पातील संधी घेण्यासाठी सीमेन्सच्या समभागांमध्ये गुंतवणूक करता येईल. तिमाही कामगिरी जाहीर केल्यानंतर नफ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे समभागात २,७७६ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. मात्र हीच खरेदीची संधी आहे.

एशियन पेन्ट्स:

सौंदर्यवर्धक रंगांखेरीज वाहन व्यवसाय, औद्योगिक कारखान्यांना लागणारे रंग तसेच पुट्टी, प्रायमर आणि स्टेनरसारखे इतर रंग साहित्य पुरविणारी ही आघाडीची कंपनी आहे. गृह सजावटीच्या व्यवसायातही कंपनीने पदार्पण केले आहे. कंपनी स्वत:चा व्हाइट सिमेंटचा कारखाना सुरू करत आहे. कंपनीने १४ नवी उत्पादने व ८,००० नवी किरकोळ विक्री दुकाने गेल्या तिमाहीत आपल्या विपणन व्यवस्थेत जोडली आहेत. गेल्या तिमाहीत पावसाळा लांबल्यामुळे घरगुती वापराच्या सौंदर्यवर्धक रंगांच्या विक्रीवर परिणाम झाला, त्यामुळे आधीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचे निकाल कमसर होते. तरीही गेल्या वर्षातील या तिमाहीच्या तुलनेत ते उजवे होते. पुढील सहा महिन्यांत खनिज तेलाच्या उतरत्या किमतीचा कंपनीला लाभ होईल. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे समभाग सरासरी २२ टक्क्यांनी वाढले आहेत. गुंतवणूकदारांना नेहमीच चांगला परतावा देणाऱ्या या कंपनीच्या समभागात सध्याच्या ३,१०० रुपयांच्या पातळीवर खरेदीची संधी आहे.

महागाई वाढीची तीव्रता कमी होण्याची आशा बळावली आहे. खरीप आणि रब्बी पिकांसाठी हे वर्ष चांगले जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे एकंदरीत वस्तूंची मागणी वाढेल. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीत या पुढील व्याजदरातील वाढींबाबत सबुरीचे धोरण ठेवण्यावर बहुमत आहे. परिणामी बाजारात मोठी घसरण येण्याची चिन्हे नाहीत. पण इंधन दरवाढ, युक्रेनचे युद्ध आणि व्याज दरवाढ यातील कुठलीही बाब बाजाराच्या अपेक्षेच्या विरूद्ध गेली तर सावध व्हायला हवे.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader