मुंबईः अर्थसंकल्पातून आखल्या जाणाऱ्या आर्थिक धोरणांचा फायदा कोणाला होईल याबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांपुढे बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाने शेअर बाजारातही शुक्रवारच्या (३१ जानेवारी) व्यवहारात चैतन्य निर्माण केले. जबरदस्त आशावादातून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांसाठी सलग चौथे सत्र मजबूत कमाईचे राहिले. बीएसई सेन्सेक्सला ७७,५००, तर एनएसई निफ्टीने २३,५०० या महत्त्वाच्या पातळ्यांना त्यामुळे ओलांडता आले.
अर्थसंकल्पाआधीच्या शुक्रवारच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ७४०.७६ अंशांच्या दमदार कमाईसह ७७,५००.५७ या पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५८.९० अंशांची भर घालून २३,५०८.४० वर बंद झाला. बाजारात झालेल्या सर्वव्यापी खरेदीने दोन्ही निर्देशांकांनी जवळपास एक टक्क्यांची वाढ साधली. शेअर बाजाराची हा सलग चौथा सकारात्मक बंद स्तर गुंतवणूकदारांच्या अर्थसंकल्प २०२५-२६ च्या महत्त्वपूर्ण घडामोडीबाबत अपेक्षा स्तरही उंचावला असल्याचे सुचविणारा आहे. शनिवारी, अर्थसंकल्पदिनी शेअर बाजारातील व्यवहार हे सकाळी ९.१५ वाजल्यापासून, दुपारी ३.३० वाजेपर्यंत असे नित्य वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार आहेत.
मध्यमवर्गीय, महिला आणि गरीब या त्रिसूत्रीवरच संभाव्य धोरणांतून लक्ष केंद्रीत केले जाईल असे संकेत देतानाच, यंदाच्या अर्थसंकल्पातून समावेशकता (Inclusion), गुंतवणूक (Investment) आणि नाविन्यता (Innovation) यावर भर दिला जाईल, असेही पंतप्रधान मोदींनी सूचित केले. अर्थात देशापुढील सध्याची आर्थिक आव्हाने आणि लोकांच्या आस-अपेक्षांचा समतोल अर्थसंकल्प साधेल, अशा आशांना प्रत्यक्षरूप मिळेल असाच त्यांच्या भाषणाचा रोख राहिला. याच जोडीला, अर्थसंकल्पाआधी लोकसभेपुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेवलेल्या आर्थिक पाहणी अहवालाने, भारतीय अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल असल्याचा दिलेला निर्वाळा शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भावताना दिसून आला. पाहणी अहवालाचे तपशील आणि मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या पत्रकार परिषदेनंतर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी उच्चांकी सूर मारल्याचे आढळून आले.
निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा कंझ्युमर, ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, नेस्ले इंडिया, एल अँड टी यांचा समावेश राहिला, तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल्स, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स शुक्रवारच्या व्यवहारात सर्वाधिक घसरले. उल्लेखनीय म्हणजे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, ज्यामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, स्थावर मालमत्ता हे निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले, तर भांडवली वस्तू निर्देशांक जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढले. व्यापक बाजारात खरेदीचा जोर राहिल्याने बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही जवळजवळ प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले.
आर्थिक पाहणी अहवालात दर्शविल्याप्रमाणे, विकासधार्जिणा अर्थसंकल्प आणि वित्तीय शिस्तीचे पालनही केले जाईल, या अपेक्षांच्या पूर्ततेच्या शक्यतेने शुक्रवारच्या सत्रात निर्देशांकांच्या मोठ्या मुसंडीस चालना दिली, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. सकारात्मक जागतिक संकेत आणि प्रमुख कंपन्यांकडून अपेक्षेपेक्षा चांगले निकाल देखील बाजारातील वाढीचा प्रवाह कायम राखण्यास ठरले कारणीभूत आहेत. वैयक्तिक प्राप्तिकरात कपात आणि रोजगार निर्मितीला चालना अर्थसंकल्पातून दिली गेल्यास, बाजारासाठी ते उत्साहदायी ठरेल. वित्तीय तूट कमी करून परंतु पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवली खर्चात वाढ करून, अर्थमंत्र्यांकडून बाजारपेठेतील मागणी आणि अर्थव्यवस्थेच्या जोमदार उभारीला निश्चित करू शकतील, असे नायर यांनी मत व्यक्त केले.
युरोपीय महासंघाची मध्यवर्ती बँक – ईसीबीने व्याजदरात पाव टक्का कपात केल्यानंतर जागतिक शेअर बाजारांना तेजीचे वळण मिळाले. युरोपातील बाजारातील सकारात्मकता पाहता, स्थानिक शेअर बाजारातील खरेदीचा उत्साह दुणावला. अमेरिकन रोख्यांच्या परतावा दरात दिसलेली घसरणही भारतातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायी ठरली.