मुंबईः जागतिक तंत्रज्ञान शेअर्सना तीव्र घसरणीचा फटका बसत असताना, भारताच्या शेअर बाजारात मात्र आयटी निर्देशांक बुधवारी (२९ जानेवारी) १.५ टक्क्यांनी वधारला. सलग दुसऱ्या सत्रात सहा शतकी भर घालून ७६,५००पलीकडे उसळलेल्या ‘सेन्सेक्स’च्या तेजीत या आयटी शेअर्सच्या मजबूत कामगिरीसह, बँकिंग आणि वित्त समभागांमधील दमदार खरेदी कारणीभूत ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने सलगपणे आगेकूच कायम राखत, कमाईचे प्रमाण वाढविले. बँकिंग आणि आयटी शेअर्समधील जोरदार तेजीमुळे, दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ६३१.५५ अंशांच्या वाढीसह ७६,५३२.९६ या पातळीवर स्थिरावला. तर एनएसई निफ्टी निर्देशांक २०५.८५ अंशांची भर घालून दिवसअखेर २३,१६३.१० वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे ०.८३% आणि ०.९०% अशी वाढ साधली. मंगळवारच्या सत्रातही दोन्ही निर्देशांकांनी जवळपास अर्धा टक्क्यांहून अधिक सकारात्मक वाढ साधली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या खरेदी किमतीत वाढीचा निर्णय घेतल्याने, साखर उत्पादन क्षेत्रातील लाभार्थी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी घेतली. बलरामपूर चिनी, रेणुका शुगर्स, धामपूर शुगर मिल्स, बजाज हिंदुस्तान आणि द्वारिकेश शुगर या शेअर्समध्ये ६ ते ९ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे ३.२८% आणि २.५४ % असे उसळले. मंगळवारी मुख्य निर्देशांक वाढले असतानाही, हे निर्देशांक अनुक्रमे १.७७% आणि ०.६१% असे गडगडले होते. एकंदरीत बुधवारी बाजारात सर्वव्यापी खरेदीचा जोर होता. परिणामी मुंबई शेअर बाजारात २,१५२ शेअर्स वधारले, तर घसरणाऱ्या शेअर्सची संख्या अवघी ४०६ अशी राहिली

तेजीचे घटक कोणते?

१. भारतीय आयटी कंपन्यांना दिलासाः वर उल्लेखिल्याप्रमाणे, दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीत सर्वात मोठे योगदान हे आयटी शेअर्समधील वाढीचे राहिले. निफ्टी आयटी Nifty IT निर्देशांकातील सर्व १० शेअर्सनी सकारात्मक क्षेत्रात बंद नोंदविला. हा निर्देशांक तब्बल २.६२% वाढीसह बंद झाला. या तेजीचे नेतृत्व पर्सिस्टंट सिस्टीम्स, एलटीआयएम, एलटीटीएस आणि एम्फॅसिस सारख्या कंपन्यांनी केले. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो सारख्या आघाडीच्या कंपन्यांतही जवळपास २% वाढ झाली. मोतीलाल ओसवाल या दलाली पेढीने, चीनच्या DeepSeek `डीपसीक´ या अल्पखर्चिक कृत्रिम प्रज्ञा (एआय) मॉडेलमुळे भारतीय आयटी कंपन्यांना धोका सोडाच उलट फायदाच होईल, असे अभ्यास टिपण प्रसिद्ध केल्यानंतर या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. विश्लेषकांचा विश्वास आहे की, आजची आयटी शेअर्सची मजबूत कामगिरी ही जागतिक स्तरावर झालेल्या तीव्र विक्रीच्या पार्श्वभूमीवर विशेषच आश्वासक ठरते.

२. फेडचा व्याजदरासंबंधी निर्णयः बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशीरा अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हचा (फेड) व्याजदरासंबंधी निर्णय येणे अपेक्षित आहे. बदललेल्या परिस्थितीत त्यातून व्याजदर जैसे थे राखण्याचा निर्णय येणे अपेक्षित आहे. तसे जरी झाले तरी ते अपेक्षेप्रमाणेच असल्याने गुरुवारी शेअर बाजारावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही.

३. केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेधः जगाच्या अर्थव्यवस्थेची दोलायमान अवस्था आणि अनिश्चित आव्हाने पाहता, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात लोकप्रिय घोषणांची शक्यता दिसून येत नाही. अर्थात सरकारच्या कर संकलनातील अपेक्षेप्रमाणे वाढ पाहता, ही सशक्त बनलेल्या महसुली बाजूतून वित्तीय तुटीवर जरी अपेक्षित उद्दिष्टाइतके नियंत्रण मिळविले गेले तरी त्याचे शेअर बाजाराकडून स्वागत होईल. तुटीवर नियंत्रण महागाईवर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, ज्यायोगे उच्च पातळीवर राहिलेले व्याजाचे दर कमी होण्याचे चक्र सुरू होईल, असा गुंतवणूकदारांचा होरा आहे.

४. रिझर्व्ह बँकेची तरलतापूरक सक्रियताः रिझर्व्ह बँकेने बँकिंग प्रणालीमध्ये तरलता आणण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांकडे, पुढील महिन्यात होणाऱ्या व्याजदर कपातीचे संभाव्य पूर्वसंकेत म्हणून विश्लेषक आणि गुंतवणूकदार पाहत आहेत. निदान अल्पकालीन कर्जाचे व्याजदर तरी यातून वाढणार नाहीत. म्हणून विशेषतः खासगी बँकांच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या सत्रात उत्साही खरेदी सुरू राहिली. परिणामी निफ्टी बँक Nifty Bank निर्देशांकाने मंगळवारच्या सत्रातील १.७% वाढीच्या तुलनेत, आज त्यात आणखी ०.६१ टक्क्यांची भर घातली.

सावधगिरी आवश्यक

दमदार उभारीसह शेअर बाजाराने उत्साही फेरवळण घेतले असले तरी, बाजाराकडे पाठ करून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सुरू असलेल्या विक्रीचा हवाला देत आणि फेडरल रिझर्व्हचा निर्णय आणि केंद्रीय अर्थसंकल्प या सारख्या अत्यंत घडामोडी पाहता, अस्थिरतेची छाया कायम असून, गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. अर्थात खरेदी अथवा विक्रीचा निर्णय संयमाने आणि कोणतीही घाई न करता घेतला जावा, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.