मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत आलेली नरमाई आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीच्या अखंड ओघामुळे सेन्सेक्सने बुधवारच्या सत्रात प्रथमच ६३ हजारांपुढील ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. त्यासह निफ्टीनेदेखील १८,८०० या सर्वोच्च उच्चांकी पातळीला स्पर्श केला.

तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१७.८१ अंशांनी वधारून ६३,०९९.६५ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६२१.१७ अंशांची झेप घेत ६३,३०३.०१ हे सर्वोच्च शिखर गाठले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १४०.३० अंशांची कमाई केली आणि तो १८,७५८.३५ या उच्चांकी पातळीवर स्थिरावला.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण समितीने व्याजदरातील वाढीचे चक्र मंदावण्याच्या दिलेल्या संकेतामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर समभाग खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र आता फेड अध्यक्षांच्या टिप्पणीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याने त्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. देशांतर्गत पातळीबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीला प्राधान्य दिल्याने सर्वच क्षेत्रीय निर्देशांकाना चालना मिळाली. विशेषत: वाहन निर्मिती, ग्राहकोपयोगी आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांना मागणी होती. चीनमधील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होण्याच्या वृत्ताने जागतिक बाजारपेठांना दिलासा मिळाला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये मिहद्र अँड मिहद्र, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, हिंदूस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि टायटन यांचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवीत होते. तर इंडसइंड बँक, स्टेट बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि आयटीसीच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी १,२४१.५७ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

रुपयाला ३४ पैशांचे बळ

देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजी आणि इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने रुपयाला बुधवारच्या सत्रात ३४ पैशांचे बळ मिळाले. परकीय विनिमय चलन मंचावर रुपया ३४ पैशांनी वधारून ८१.३८ पातळीवर स्थिरावला.

Story img Loader