Share Market Today : भारतीय शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीनंतर, आज ४ फेब्रुवारी रोजी मोठी तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती, भक्कम उत्पादन आकडेवारी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ यामुळे मंगळवारी बाजारात सुमारे १ ते १.७० टक्के वाढ दिसून येत आहे. चीनने अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीला प्रत्युत्तर म्हणून वाढवलेले आयात शुल्क आणि गुगलविरुद्ध चौकशी सुरू केली असूनही, भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.

दुपारी ३:०० वाजता सेन्सेक्स १३१० अंकांनी किंवा १.७०% ने वाढून ७८,४९६.९७ वर पोहोचला होता, तर निफ्टी ५० निर्देशांक ३६८.८० अंकांनी किंवा १.५८% ने वाढून २३,७२९.८५ वर पोहोचला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयात शुल्कावर स्थगिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडा येथून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवरील अतिरिक्त शुल्क तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी, अमेरिकेने कॅनेडियन आणि मेक्सिकन आयातीवर २५% आणि चिनी वस्तूंवर १०% कर लादण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे जागतिक व्यापार युद्ध तीव्र झाले होते. पण अमेरिकेने चीन वगळता बाकी दोन देशांबाबत एक पाऊल मागे घेतल्यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारामध्ये तेजी आली आहे.

भारतीय उत्पादन क्षेत्रात सुधारणा

भारताच्या उत्पादन क्षेत्रात सुधारणा होण्याची चिन्हे दिसून आली आहेत, एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) डिसेंबरमध्ये ५६.४ वरून जानेवारीमध्ये ५७.७ वर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून मागणीत मोठी वाढ तसेच जीएसटी संकलनात वाढ दिसून आली, जी जानेवारीमध्ये १.९२ लाख कोटी रुपयांच्या नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवरून १३ पैशांनी वाढून ८६.९८ वर व्यवहार करत आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर अमेरिकन डॉलर निर्देशांक १०९.८८ वरून १०८.७४ वर घसरल्यानेही रुपयाला आधार मिळाला आहे.

आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी

आज प्रमुख आशियाई निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी १ ते २ टक्क्यांनी वाढला आहे. ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माम झाल्या आहे.

Live Updates
Story img Loader