मागच्या लेखात मी म्हटले होते की, गरीब किंवा श्रीमंत कुणीही पॉन्झी घोटाळ्यापासून सुटलेले नाहीत, किंबहुना श्रीमंत लोकच त्यात जास्त फसल्याचे समोर आले आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण अमेरिकेमध्ये जितके घोटाळे होतात तितके घोटाळे कदाचित कुठल्याच देशात होत नसावेत. आता माझे लेख कदाचित अमेरिकेत वाचत नसतील पण तरीही त्यांच्याच देशात घडलेल्या घोटाळ्यांची माहिती तरी त्यांनी ठेवावी अशी माफक अपेक्षा. नुकत्याच उघडकीस आलेल्या घोटाळ्याविषयी तुम्ही वाचले तर असे वाटेल की, हे कधीतरी कुठे तरी वाचले होते. म्हणजे चार्ल्स पॉन्झी काय किंवा बर्नी मेडॉफ काय यापासून अमेरिकी नागरिकांनी काही बोध घेतला असे वाटत नाही.
या नवीन घोटाळ्यात भारतीयांचा आणि पाकिस्तान्यांचासुद्धा हातभार आहे. घोटाळेबाजाचे नाव आहे सिद्धार्थ जवाहर आणि याचे वय आहे फक्त ३६ वर्षे. याच्या इतिहासाची फारशी काही माहिती मिळत नाही, पण अमेरिकेतल्या टेक्सास आणि मिसूरी या दोन राज्यांमध्ये त्याने केलेल्या घोटाळ्याचा तपास सुरू आहे. तिथल्या पोलिसांनी या घोटाळ्याचे अजून काही पीडित असतील तर त्यांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन देखील केले आहे. अगदी इतर सगळ्या घोटाळ्यांप्रमाणे या घोटाळ्याचीसुद्धा सारखीच कार्यपद्धती होती. सिद्धार्थने लोकांकडून पैसा गोळा केला आणि तो गुंतवला पाकिस्तानी कंपनीमध्ये जिचे नाव होते फिलिप्स मॉरिस पाकिस्तान लिमिटेड म्हणजे पीएमपी. वर्ष २०१५ पर्यंत तो चांगल्या गुंतवणुकीत पैसे ठेवत होता. पण त्यानंतर त्याने गुंतवणूकदारांचे पैसे पीएमपीमध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि हळूहळू सुमारे ९९ टक्के पैसे त्याने तिकडे वळवले. तो लोकांना सांगत राहिला की, तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि पीएमपीचा भाव आता ४,००० पाकिस्तानी रुपयांपर्यंत गेला आहे. पण त्यावेळेला तो भाव बराच खाली आला होता आणि तरीही गुंतवणूकदारांना तो खोटेच सांगत राहिला. थोड्या दिवसांनी त्याच्याकडे पैसे काढून घेण्याच्या विनंत्या आल्यावर त्याने मात्र नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या लोकांना द्यायला वळवले आणि ते त्या राज्याच्या न्यायालयात सिद्ध देखील झाले. त्यामुळे त्याचे गुंतवणुकीचे हक्क म्हणजे परवाना काढून घेण्यात आला आणि त्याची कंपनी ”स्विफ्टआर्क”वर बरीच बंधने आली.
हेही वाचा : ‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४
हे होऊन देखील हा महाठग लोकांना भुलवतच राहिला आणि अजून एका गुंतवणूकदाराकडून १० लाख डॉलर घेतले. उद्योग करून बुडाला तर अमेरिकेत काही त्याचे वावगे नसते. सिद्धार्थने लोकांना सांगितले असते की, त्याच्या सगळ्या गुंतवणुकी एकाच कंपनीत आहेत आणि त्या बऱ्याच खालच्या भावात आहेत तरी ठीक होते. मात्र त्याचा गुन्हा होता की, त्याने चुकीची माहिती दिली आणि आलेले पैसे जुन्याची देणी फेडायला वापरली. परत याची जीवनशैलीसुद्धा सामान्य माणसाला हेवा वाटावा अशीच होती. चैन करणे, महागड्या गाड्या, चार्टर्ड विमानातून फिरणे वगैरे त्याचे शौक होते. यामुळे एकंदरीत २५ लाख डॉलर म्हणजे सुमारे २०७ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. हा नव-पॉन्झी सध्या तुरुंगात असून निकालाची म्हणजे शिक्षेची वाट बघत आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार त्याला २५ वर्षांच्या कारावासाची अधिकतम शिक्षा देखील होऊ शकते.
डॉ. आशीष थत्ते
@AshishThatte
ashishpthatte@gmail.com
———— समाप्त ————