मुंबई: चांदीच्या भावाची चालू महिन्यात आगेकूच सुरूच असून, सोमवारी ते किलोमागे ९३,२१५ रुपये या अभूतपूर्व पातळीवर पोहोचले. यामुळे चांदीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि सोन्यापेक्षा सरस कामगिरी या महिन्यात केली आहे. चालू महिना संपायला अद्याप १० दिवस असताना, चांदीच्या भावात तब्बल ११.२९ टक्के वाढ साधली आहे.
सोमवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने मुंबईच्या सराफ बाजारातील घाऊक व्यवहार बंद होते. तथापि आंतरराष्ट्रीय बाजारात (लंडन मेटल एक्स्चेंज) चांदीचे वायदे २०१२ नंतर प्रथमच ३१.२७ अमेरिकी डॉलर प्रति औंस (२८.३५ ग्रॅम) या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर, तर सोने प्रति औंस २,४४९.८९ डॉलरच्या उच्चांकावर व्यवहार करीत होते.
हेही वाचा >>> खासगी-सरकारी बँकांचा एकत्रित नफा विक्रमी ३ लाख कोटींवर; आर्थिक वर्षातील कामगिरीचे पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
उद्योग क्षेत्राकडून वाढलेली मागणी आणि अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेकडून यंदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळे दोन्ही मौल्यवान धातू सोने-चांदीच्या भावात वाढ सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत चांदीच्या भावात झालेली वाढ ही चालू वर्षातील एकूण वाढीच्या ६० टक्के आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत चांदीच्या भावात प्रतिकिलो १६ हजार रुपयांची म्हणजेच २१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
वस्तू वायदा बाजार मंच एमसीक्सवर गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीने ९०,३९१ रुपयांची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली होती. सेन्सेक्सचा विचार करता मे महिन्यात निर्देशांकाची सुरूवात त्याने ७४,४८२ अंशापासून केली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी निर्देशांक ७३,९१७ अंशांवर बंद झाला. याचवेळी सोन्याचा भाव मे महिन्यात प्रति दहा ग्रॅमला ३,१३५ रुपये म्हणजेच ४.४५ टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याच्या भावात २०२४ मध्ये प्रति दहा ग्रॅमला १०,३५९ रुपये म्हणजेच १६.३८ टक्के वाढ झाली आहे. आभासी चलन बिटकॉईनच्या भावाने अलिकडे उचल खाल्ली असून, मे महिन्यात २,६०५ डॉलर म्हणजेच ४ टक्के वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे बिटकॉईनची कामगिरी ही सेन्सेक्सपेक्षा उजवी ठरली असली तरी चांदी आणि सोन्यातील तेजीने तिला झाकोळले आहे.