SIP Investment: देशांतर्गत म्युच्युअल फंड क्षेत्रात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) नोंदणींमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. परंतु एसआयपी अकाउंट्स वेळेपूर्वी बंद करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. २०२३ मध्ये ३.४८ कोटी एसआयपी अकाउंट्सची नोंदणी झाली होती, परंतु २०२४ च्या अखेरीस केवळ १.८२ कोटी एसआयपी खाती सक्रिय होती. याचा अर्थ असा की नोंदणीनंतर दोन वर्षांत बंद झालेल्या SIP खात्यांचा दर ४८ टक्के आहे.
परंतु एसआयपी अकाउंट्स मुदतपूर्व बंद होण्याचे हे प्रमाण मागील वर्षांपेक्षा कमी आहे. २०२२ मध्ये २.५७ कोटी एसआयपी अकाउंट्सची नोंदणी होती आणि त्यापैकी ४२ टक्के खाती २०२३ च्या अखेरीस बंद झाली. ही आकडेवारी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या मासिक अहवालांमधून समोर आली आहे. जी केवळ फंड हाऊसेसकडेच उपलब्ध असते. असे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.
गुंतवणुकीचा आदर्श कालावधी
उद्योग आणि गुंतवणूक तज्ञ दीर्घकालीन इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी एसआयपीची शिफारस करतात. साधारणपणे ३ वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक टिकवणे आदर्श मानले जाते. म्युच्युअल फंड उद्योगातील अधिकाऱ्यांच्या मते, एसआयपी नोंदणींमध्ये सातत्याने होणारी वाढ तसेच बंद होणाऱ्या एसआयपी अकाउंट्सच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत आहेत.
फिनटेक प्लॅटफॉर्मचे परिणाम
एसबीआय म्युच्युअल फंडचे उपव्यवस्थापकीय संचालक डीपी सिंग म्हणाले, “एसआयपी अकाउंट्स बंद होण्याचे प्रमाण वाढणे हे प्रामुख्याने वाढत्या फिनटेक प्लॅटफॉर्मचे परिणाम आहे.” याबबतही बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तात उल्लेख आहे.
गुंतवणुकीची सोय आणि कमिशन-मुक्त थेट योजनांमुळे अलिकडच्या काळात ग्रोव, झेरोधा इत्यादी फिनटेक प्लॅटफॉर्म लोकप्रिय झाले आहेत. परंतु या प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा होल्डिंग कालावधी बँका आणि वैयक्तिक वितरकांसारख्या पारंपारिक वितरण माध्यमांच्या तुलनेत कमी असतो. एएमएफआयच्या अहवालानुसार, नियमित योजनांअंतर्गत बहुतेक गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असतो. तर फिनटेक प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे नोंदणी केलेल्या थेट योजनांच्या बाबतीत, होल्डिंग कालावधी कमी असतो.
मार्च २०२४ पर्यंत, नियमित योजनांमध्ये २१.२ टक्के गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त होता, तर थेट योजनांमध्ये हा आकडा फक्त ७.७ टक्के होता.