सरलेल्या तीन आठवड्यांचा काळ गुंतवणूकदारांसाठी भीती, संयम, उत्कंठा, उत्साह आणि आनंद अशा संमिश्र भावना देणारा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या आठवड्यात जाहीर झाले, त्या आठवड्यात बाजाराने दाखवलेला ‘नाटकी अंक’ संपवून निफ्टी आणि सेन्सेक्स दोघांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ऐतिहासिक ८०,००० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टीने देखील २५,००० अंशांच्या दिशेने पावले टाकली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दान की रणनीती ?

सापशिडीच्या खेळात जो जिंकतो त्यामध्ये दोन शक्यता असतात. तुम्हाला योग्य वेळी योग्य दान पडले आणि त्यामध्ये शिडी आली तर इतरांपेक्षा कमी वेळेत तुम्ही वर पोहोचता. दुसरी शक्यता म्हणजे कोणतीही शिडी न मिळता सापाने मात्र गिळलेले नाही गिळले तरीही तुम्ही शंभरापर्यंत पोहोचू शकता. सध्या सेन्सेक्स ८०,००० अंशांच्या उंबरठ्यावर असताना भारतीय गुंतवणूकदारांची अशीच काहीशी अवस्था आहे. शिडी मिळेल की नाही यापेक्षा नेमका साप आपल्या पदरी यायला नको हे समजून घ्यायला हवे. आपण गुंतवणूक करत असलेल्या शेअर अथवा फंडाचे जोखीमविषयक सर्व निकष तपासून पाहिल्याशिवाय प्रवाहाबरोबर जाऊन गुंतवणूक करणे धोक्याचे ठरणार आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ भारतीय बाजार ‘महाग आहेत’ हे सूतोवाच करत आलेच आहेत. अलीकडे भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनीही याबाबत आपले मत व्यक्त केले. अनेक पहिल्या पिढीतील युवा गुंतवणूकदार ‘डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट’ मध्ये आपले नशीब आजमावायच्या नादात बाजारातील अनपेक्षित पडझळीमुळे गुंतवणुकीतील उत्साहात हरवून बसायला नकोत.

हेही वाचा : मार्ग सुबत्तेचा : सुकन्येची समृद्धी

भारतीय शेअर बाजारात तेजी यायची असेल तर परदेशी गुंतवणूकदारांशिवाय पर्याय नाही हे आधीच्या ‘बाजार-रंग’ मध्ये सविस्तरपणे लिहिले होते, ते आता स्पष्ट झाले आहे. बाजारातील आशादायक बातम्या आणि घडामोडींमुळे पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारांकडे परदेशी गुंतवणूकदार वळायला सुरुवात होतील असे चिन्ह दिसू लागले आहे. एका खासगी वित्तसंस्थेच्या संशोधन विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात गुंतवणूक करणारे परदेशातील फंड आता पुन्हा कार्यरत व्हायला लागले आहेत असे दिसते. मार्च २०२४ अखेरीस यातील एकूण गुंतवणूक २.३ अब्ज डॉलर एवढी होती. परदेशी गुंतवणूकदार आपले गुंतवणूकविषयक धोरण ठरवताना उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये किती पैसे गुंतवायचे किंवा एकूण गुंतवणुकीपैकी किती टक्के पैसे गुंतवायचे याचे धोरण ठरवतात. अशा फंडांनी मागील वर्षात पोर्टफोलिओच्या १४ टक्के पैसे भारतीय शेअर बाजारांसाठी मुक्रर केले होते. यावर्षी तोच आकडा १८ टक्क्यांपलीकडे पोहोचला आहे. अर्थात हे पैसे टप्प्याटप्प्याने गुंतवले जातात. त्यामुळे येत्या काही महिन्यात शेअर बाजारात पैशाचा ओघ वाढू लागला तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

साहेबांची परीक्षा

युरोपातील ब्रिटनचा मागच्या पाच वर्षाचा राजकीय इतिहास रोमहर्षकच आहे. युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याचा आपला निर्णय घेतल्यावर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत बदल घडून यायला सुरुवात झाली. ब्रेक्झिट आणि त्याचे बरे वाईट परिणाम दिसायला आणखी काही काळ नक्की जावा लागेल. या पार्श्वभूमीवर तेथील निवडणुकीचे निकाल आपल्या दृष्टीने अभ्यासायला हवेत. ऋषी सूनक यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पराभव करून सत्तेत आलेल्या मजूर पक्षाने सर कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केले आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार होण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. सत्तेत आल्यावर भारताशी अशा प्रकारचे दीर्घकालीन व्यापारी संबंध प्रस्थापित करू असे आश्वासन नवनिर्वाचित पंतप्रधानांनी आपल्या प्रचारादरम्यान दिले होते. ही नवी व्यापारी भागीदारी आपल्यासाठी फायदेशीर ठरावी हीच अपेक्षा. ब्रिटनच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये २ पेक्षा अधिक भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आहेत. यामुळे शेअर बाजारात पैसा येईल असे नसून, सामरिक भागीदारी या नव्या जागतिकीकरणाच्या गणितांचा वापर भारत कसा करतो हे बघायला हवे.

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण – क्वान्ट मिड कॅप फंड

इंडेक्स आणि सेक्टर फंडांकडे रोख

गेल्या काही महिन्यात भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांसाठी ज्या म्युच्युअल फंडाच्या नव्या योजना उपलब्ध झाल्या आहेत, त्या बरेच काही शिकवून जातात. एसबीआय सिल्वर ईटीएफ, बंधन निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड, एचडीएफसी निफ्टी १०० लो व्होलेटॅलिटी ३० इंडेक्स फंड, ॲक्सिस निफ्टी ५०० इंडेक्स फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एनर्जी अपॉर्च्युनिटी फंड, मिरे निफ्टी ईव्ही अँड न्यू एज ऑटोमोटिव्ह ईटीएफ या फंडांच्या नावाकडे पाहिले इंडेक्स फंड आणि सेक्टर थीम असलेले फंड यांचा बोलबाला दिसतो. इंडेक्स फंड हेच भविष्यातील दीर्घकालीन गुंतवणुकीचे आधारस्तंभ ठरणार आहेत. मात्र भारतीय गुंतवणूकदारांची त्याबाबतची समज अजून कमी आहे. याउलट मागील चार ते पाच वर्षात बाजारातील नाव घ्यावे ते प्रत्येक सेक्टर घसघशीत परतावा देणारे ठरले आहे. सेक्टरल फंडातील गुंतवणुकीचा लाभ घ्यायची इच्छा प्रत्येकाला झाली तर त्यात नवल काय? यात एक धोका असा की, तुम्ही निवडलेल्या सेक्टरची संधी संपली आणि परतावा कमी झाला तर तुमचा एकूण पोर्टफोलिओ योग्य परतावा देत नाही. आकर्षक परतावा आणि दीर्घकालीन स्थिर परतावा या दोन वेगळ्या बाबी आहेत, हे कमी अर्थसाक्षरता असलेल्या भारतासारख्या देशात समजायला वेळ जाईल.

हेही वाचा : Money Mantra: होम लोन मुदतीपूर्वीच चुकते करावे की, नाही?

पुढील आठवड्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडींकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवायला हवे. भारताप्रमाणेच अमेरिकेतील बाजारही उच्चांक गाठत आहेत. ‘वॉल स्ट्रीट’वर नॅसडॅक आणि एस अँड पी ५०० हे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेतील बेरोजगारीचा आकडा समाधानकारक पातळीवर पोहोचेल, अशी अपेक्षा धरून सप्टेंबरपर्यंत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा ‘वॉल स्ट्रीट’वर असल्याने बाजार वर गेले की काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकी तंत्र कंपन्यांचे ‘झेपावे उत्तरेकडे’ अशा प्रकारचे किमतीचे आकडे पाहून या शतकाच्या सुरुवातीला जसा फुगवटा आला होता तशीच परिस्थिती येते की काय असा अंदाज मांडला जातो आहे.

भारतातील समग्र अर्थात ‘मॅक्रो’ आघाडीवरील सर्व निर्देशांक सध्या तरी सकारात्मक आकडेवारी दाखवत आहेत. गुंतवणूकदारांचा उत्साह सापशिडीतील अचानक येणाऱ्या सापामुळे जाणार नाही हीच अपेक्षा.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market analysis investors nifty sensex mutual funds bse nse print eco news css
Show comments