Market Crash: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील विविध देशांवर व्यापारकर लादला आहे. त्यांच्या या निर्णयाचा जागतिक स्तरावर शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत आतापर्यंत जाहीर केलेल्या टॅरिफचा भारतावर मध्यम परिणाम होण्याची अपेक्षा आहे, परंतु बीएसई मार्केट कॅपिटलाझेशनने सुचवल्याप्रमाणे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटी रुपये आधीच बुडाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यापासून, भारताचे मार्केट कॅप ४५.५७ लाख कोटी रुपयांनी घसरून ३,८६,०१,९६१ कोटी रुपयांवर आले आहे. शेअर बाजारात अनिश्चिततेला स्थान नाही आणि ती आजकाल त्याच्या शिखरावर आहे. ही भीती व्हीआयएक्स निर्देशांकात दिसून आली आहे. जो आज ५२.२५ टक्क्यांवरून २०.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. व्हीआयएक्स निर्देशांक पुढील ३० दिवसांतील बाजारातील अस्थिरता दर्शवतो.

ट्रम्प यांनी सुरुवातीला धातू आणि ऑटो आणि ऑटो कंपोनंटवर व्यापारकर लादण्याची घोषणा केली आणि नंतर व्हिएतनामसारख्या देशांसाठी ४६ टक्क्यांपर्यंतचे व्यापारकर लादले. दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के व्यापारकर लादला आहे. तर भारत अमेरिकन आयातीवर ५२ टक्के व्यापारकर आकारत आहे.

“जागतिक स्तरावर अत्यंत अनिश्चिततेमुळे शेअर बाजारात अस्थिरता आहे. ट्रम्प यांच्या व्यापारकरामुळे निर्माण झालेली ही अशांतता कधीपर्यंत राहील याची कोणालाही कल्पना नाही. बाजाराच्या या अशांत काळात पुढे काय होईल हे पाहणे ही सर्वोत्तम रणनीती असेल,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले. याबाबत बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे.

विजयकुमार पुढे म्हणाले की, “ट्रम्प यांचे अतार्किक व्यापारकर जास्त काळ टिकणार नाही आणि भारताची अमेरिकेला होणारी निर्यात जीडीपीच्या टक्केवारीच्या जवळपास फक्त २ टक्के असल्याने भारत तुलनेने चांगल्या स्थितीत आहे आणि त्यामुळे भारताच्या विकासावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.”

भारतीय शेअर बाजारावर परिणाम

दरम्यान ट्रम्प यांच्या व्यापारकराचा आज भारतीय शेअर बाजारावरही नकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी ११ पर्यंत सेन्सेक्स २,८२४.८२ अंकांनी किंवा ३.७५ टक्क्यांनी घसरून ७२,५३९.८७ वर आणि निफ्टी ९१६.४० अंकांनी किंवा ४.०० टक्क्यांनी घसरून २१,९८८.०५ वर व्यवहार करत होते. या दरम्यान सुमारे २५६ शेअर्स वधारले असून ३१८३ शेअर्स घसरले आहेत. तर, ९४ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.