Stock Market Crash : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही (२८ फेब्रुवारी) शेअर बाजारात १००० अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स सुरुवातीला ५०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, १००० अंकांनी घसरला आहे. याबरोबरच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे गुंतवणुकदारांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी लाल रंगात खुले झाले. सकाळी १०:०३ वाजता सेन्सेक्स १,००९.६४ अंकांनी किंवा १.३५ टक्के घसरून ७३,६०२.७९ वर होता आणि निफ्टी ३१६.२५ अंकांनी किंवा १.४ टक्के घसरून २२,२२८.८० वर होता. सुमारे ५१७ शेअर्स वाढले आणि २,६६१ शेअर्समध्ये घट झाली. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ६.१ लाख कोटी रुपयांनी घसरले आणि निफ्टी ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या नव्या घोषणांचे बाजारात तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिकेच्या बाजाराचे परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी इतर देशांकडून अमेरिकन वस्तूंवर अवलंबल्या जाणाऱ्या टॅरिफ धोरणाविरोधात कठोर भूमिका घेतली. आता डोनाल्ट ट्रम्प यांनी २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केलं की, मेक्सिकन आणि कॅनेडियन वस्तूंवर त्यांचे प्रस्तावित २५ टक्के शुल्क ४ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच चीनी आयातीवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लागू होईल. या धोरणांचा परिणाम अमेरिकन शेअर मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी अडखळत झाली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची घसरण झाली. पहाटे २.२७ वाजता सेन्सेक्स ७३० अंकांनी किंवा १ टक्क्यांनी घसरून ७३,८७९ वर तर निफ्टी २१२ अंकांनी किंवा १ टक्क्यांनी घसरून २२,३३२ वर होता. तर निफ्टी ५० निर्देशांक फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत ४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तसेच बँक निफ्टीही ४०० अंकांच्या घसरणीवर व्यवहार करत होता. आजच्या व्यवहारात निफ्टीवरील बँक, फायनान्शियल, ऑटो, फार्मा, मेटल आणि एफएमसीजी, आयटी, रिअल्टी निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत. या संदर्भातील वृत्त मनी कंट्रोल दिलं आहे.
दरम्यान, सेन्सेक्सवर एचसीएल टेक, मारुती, एम अँड एम, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल, टाटा मोटर्स हे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. तसेच रिलायन्स, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले आहेत. याबरोबरच कन्झ्यूमर ड्युराबेल्स, ऑईल अँड गॅस, निफ्टी मेटल, फार्मा हे निर्देशांकही घसरले आहेत.
जागतिक बाजारपेठेतही मोठी घसरण
जागतिक बाजारपेठेतही ३ टक्के घसरण झाली आहे. कोरियाचा कोस्पी ३.०८ टक्के, जपानचा निक्केई २.८१ टक्के, हाँगकाँगचा हँग सेंग २.२७ टक्के, चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स ०.८८ टक्क्यांनी घसरला आहे.