जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण आणि गेल्या काही सत्रातील तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३३ अंशाच्या घसरणीसह विसावला. उल्लेखनीय म्हणजे, सेन्सेक्स नकारात्मक पातळीवर स्थिरावला असला तरी दुसरीकडे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल बुधवारच्या सत्रात ३०० लाख कोटींच्या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३.०१ अंशांनी घसरून ६५,४४६.०४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २२२.५६ अंश गमावत ६५,२५६.४९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९.५० अंशांची वाढ झाली आणि तो १९,३९८.५० या विक्रमी उच्चांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात निफ्टीने १९,४२१.६० ही सत्रातील उच्चांकी तर १९,३३९.६० अंशांचा नीचांक गाठला.
हेही वाचाः सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला; जून महिन्यात पीएमआय निर्देशांक ५८.५ गुणांवर घसरला
जागतिक प्रतिकूलतेसह चिंतेसह सेवा क्षेत्राने तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीची घोडदौड थांबली. दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध तीव्र झाल्याने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अनिश्चिता निर्माण होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला होता. दिवसातील बहुतांश काळ बाजार नकारात्मक पातळीवर राहिला. मात्र अखेरच्या काही तासात बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागातील खरेदीने घसरण काहीशी कमी झाली.
सेन्सेक्समध्ये, एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर मारुती, टेक महिंद्र, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड आणि नेस्ले यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.
सेन्सेक्स ६५,४४६.०४ – ३३.०१ (-०.०५)
निफ्टी १९,३९८.५० + ९.५० (+०.०५)
डॉलर ८२.२३ +२२
तेल ७५.९२ -०.४३