मुंबई शेअर बाजाराची ९ जुलै १८७५ ला सुरुवात झाली. १४८ वर्षांच्या आतापर्यंतच्या प्रवासात बाजाराने २२ अध्यक्ष बघितले. मात्र या सर्व अध्यक्षांमध्ये भगीरथ मर्चंट यांचे एक वेगळे आणि विशेष स्थान आहे. शिक्षण, पदवी आणि अनुभवाच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराकडून शेअर बाजाराचे सभासदत्व मिळवणारे ते पहिले दलाल होते.
हेही वाचा- बाजारातली माणसं : प्रगतीसाठी संघर्ष.. हर्ष मारीवाला
शेअर बाजारात होणाऱ्या समभागांच्या खरेदी-विक्रीप्रमाणे शेअर बाजाराचे कार्डदेखील वेगवेगळ्या किमतीला खरेदी किवा विक्री केले जायचे, त्यांची बाजारात नोंदणी नव्हती. शक्यतो इतरांना हे कार्ड मिळत नव्हते, वारसाहक्काने जर वारसदार असेल तर कार्ड वारसदारांच्या नावावर केले जायचे.
बी.कॉम, एफसीए, एमबीए या पदव्या घेतल्यानंतर भगीरथ मर्चंट फीकॉम या संस्थेत नोकरीला रुजू झाले. मुकुल तर किसनदास आणि प्रदीप हरकिसनदास यांची ही संस्था होती. कंपन्याच्या ठेवी गोळा करण्यासाठीदेखील दोनच प्रमुख संस्था कार्यरत होत्या. एक डीएसपी आणि दुसरी फीकॉम होती. मर्चंट बँकर म्हणून १९६८ ला ग्रीनलेज बँक या बँकेने हा व्यवसाय सुरू केला. खासगी क्षेत्रात १९७१-७३ या काळात खासगी क्षेत्रातील शेअर दलालांनी सुरू केलेली पहिली मर्चंट बँकिंग कंपनी ही फीकॉम होती. १९७३ ते ८३ या दहा वर्षांत मर्चट बँकर म्हणून भगीरथ मर्चंट यांनी काम केले. मुंबई शेअर बाजाराकडून अधिकृतपणे कार्ड मिळवणारे ते पहिले प्रोफेशनल शेअर ब्रोकर होते. पुढे मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. मुंबई शेअर बाजाराची माहिती फक्त देशात, परदेशात नाही तर लहान गावांमध्येदेखील पोहोचवण्यामध्ये मर्चंट यांचे मोठे योगदान आहे. लहान गावांमध्ये व्याख्यानासाठी जाऊन भगीरथ मर्चंट शेअर बाजाराची ओळख करून दयायचे.
हेह वाचा- बदलत्या गिअरचे गणित !
एम.बी.ए. फायनान्स करणाऱ्या विदयार्थ्यांना रविवारच्या सुटीच्या दिवशी चार-पाच तास मुंबई शेअर बाजार आणि त्यासंबंधातील सर्व कायदे, नियम समजावून सांगणे ही त्या काळात अतिशय आश्चर्यकारक घटना होती. त्यांच्याकडे आकर्षक वक्तृत्व शैली, विषय सोपा करून सांगण्याची हातोटी होती. सुरुवातीला गिरगावातील चाळीत राहिलेले असल्यामुळे मराठी नाटके, गणेश उत्सव, दहीहंडी इत्यादी सर्व कार्यक्रमांत सहभागी होणारा हा गुजराती माणूस निराळाच होता. मराठी शिव्या आणि ओव्यांमध्येही सराईत होते. त्याचबरोबर आचार्य अत्रेंचे विनोद देखी; अगदी तोंडपाठ होते. अत्रे यांनी सांगितलेला एक किस्सा तर ते भाषणात हमखास सांगत असत. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी आचार्य अत्रे रेल्वेत बसले होते, गाडी स्थानकावर थांबल्यानंतर त्यांनी प्लॅटफॉर्मवरील माणसाला कोणते स्थानक आहे हा प्रश्न विचारला. ज्याला प्रश्न विचारला त्याने सांगितले की, एक आणा द्याल तर सांगतो. त्यावर अत्रे म्हणाले की, नको सांगू अहमदाबाद स्टेशन आले हे कळले आहे.
हेही वाचा- बाजारातील माणसं : अजय पिरामल – निपुण व्यवहार कारागिरी
मुंबई शेअर बाजाराचे कार्ड जेवढ्या सहजपणे त्यांनी मिळवले तेवढ्या सहजपणे त्यांनी कार्ड विकण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्य ठरला कारण त्यांचा मुलगा आलाप त्यांच्या व्यवसायात येणार नाही हे त्याच्या लहाणपणीच भगीरथ मर्चंट यांना समजलेले होते. कोठे थांबावे हे ज्याला कळते तोच आयुष्यात यशस्वी होतो.
कमल कावरा अध्यक्ष असताना रिलायन्सच्या एक प्रकरणामुळे ऐन दिवाळीत मुंबई शेअर बाजार अडचणीत आला होता. मुंबई शेअर बाजारातील रिलायन्सच्या समभागांची नोंदणी आम्ही रद्द करतो आणि फक्त राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी कायम ठेवतो, अशी धमकी धीरूभाईंनी दिली होती. ही घटना मुंबई शेअर बाजाराच्या दलालांच्या दृष्टिकोनातून फारच धक्का देणारी होती. कारण तोपर्यंत मुंबई शेअर बाजाराच्या दलालांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे सभासदत्व घेण्याचे तोपर्यंत विचारात घेतले नव्हते. भगीरथ मर्चंट मुंबई शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष होते, मात्र दिवाळीच्या त्या दिवसात यशस्वी मध्यस्थी आणि वाटाघाटी करून मुंबई शेअर बाजाराला त्यांनी एका मोठ्या संकटातून सोडवले. भगीरथ मर्चंट यांच्याबद्दल आणखी खूप लिहिता येईल. मात्र थोडक्यात जेवढे आवश्यक होते तेवढे लिहिले आहे.
हेह वाचा- बाजारातली माणसं: लढवय्या माणूस
शेअर बाजारातील व्यक्तीला निवृत्ती हा शब्द माहिती नसतो. १९९९ पासून भगीरथ मर्चंट यांनी शिकवणे हा व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो हे ध्येय डोक्यात ठेवून शेअर बाजाराबरोबरच व्यवसाय आणि नीतिमत्ता हे विषय शिकवणे सुरू ठेवले. १९९५ ला त्यांना इंडियन कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट यांनी समाजश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. अलीकडे त्यांनी पराग पारिख एएमसी या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. अनेक सामाजिक संस्थासाठी त्यांना जे शक्य होईल ते काम ते करीत असतात. थोडक्यात शेअर बाजाराशी गेली ५० वर्षे संबंधित असलेली व्यक्ती भगीरथ मर्चंट हे नाव विसरणार नाही.
(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)