-प्रमोद पुराणिक
शंकरन नरेन हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. बाजारातला हा माणूस असा आहे की, अगदी लहान वयातच बाजारातले टक्के टोणपे, चढ-उतार सहन करून बाजारावर प्रभुत्व मिळवलेले नरेन आज सुद्धा जमिनीवर पाय असणारे आहेत. कुठेही डोक्यात हवा गेलेली नाही, हे त्यांचे अनोखेपण. बाजार रोज काही तरी शिकवून जातो, असे त्यांचे म्हणणे बरेच काही सांगून जाणारे आहे. शिक्षण आणि अनुभव दोन्हीचा समृद्ध वारसा त्यांना लाभला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी वडील आणि मुलगा क्रिकेटचा खेळ जोडीने बघायचे आणि शेअर बाजारातील शेअर्सच्या किंमतीच्या चढ-उताराचे आलेखसुद्धा. नवीन कंपनीच्या शेअर्स विक्रीला दोघांनीही अर्ज करायचा आणि अलॉटमेंट मिळाले की ते शेअर्स विकायचे अशी वडील आणि मुलगा दोघांमध्ये स्पर्धा असायची. त्या वयात ‘ग’ची बाधा झाली आणि १९९६ ला मोठा फटका बसला. पण नाउमेद न होता, त्यांनी बाजाराबद्दल तिटकारा निर्माण होऊ दिला नाही. आपले काय चुकले याचा आढावा घेतला. पुन्हा नवीन जोमाने गुंतवणुकीला सुरुवात केली.
प्राथमिक भांडवल बाजाराबरोबर दुय्यम भांडवल बाजारपेठेत एखादा शेअर पुरेपूर अभ्यास करून शोधणे, मोठ्या प्रमाणावर त्यात गुंतवणूक करणे. आपला मित्र श्याम याच्या बरोबर टीटीके प्रेस्टिज या कंपनीचे ५ लाख शेअर्स त्यांनी घेतले. त्यावेळेस डिमॅट पद्धत नव्हती. ५ हजार ट्रान्सफर फॉर्म त्यांनी भरले. शेअर्स नावावर करून घेतले, पैसा कमावला. एम. एम. फोर्जिंग या दुसऱ्या कंपनीनेसुद्धा नरेन यांना भरपूर पैसा मिळवून दिला. आणि मग वयाच्या ३४ व्या वर्षी नरेन सर मुंबईला आले.
आणखी वाचा-Money Mantra : माझा पोर्टफोलियो- ओपल-वेअर क्षेत्रातील अग्रणी कंपनी
त्या अगोदर आयआयटी मद्रास (चेन्नई) येथून बी. टेक मॅकेनिकलचे पदवी शिक्षण त्यांनी १९८३ ते १९८७ दरम्यान पूर्ण केले. त्यानंतर १९८७ ते १९८९ इंडियन इन्स्टिटयूट मॅनेजमेंट ऑफ कलकत्ता या ठिकाणी फायनान्स हा विषय घेऊन एमबीए पदवी मिळवली. २००० ते २००३ एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. ऑक्टोबर २००४ ला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडात ते रुजु झाले आणि या संस्थेशी एकनिष्ठ राहिले. गुंतवणूकदार परिषदा, म्युच्युअल फंड वितरक, प्रतिनिधी यांच्या बरोबर सततचा वार्तालाप आणि कायम गुंतवणूकदार हा केंद्रबिंदू ठेऊन नरेन यांची वाटचाल चालू आहे.
बाजारात गुंतवणुकीच्या दोन पद्धती आहेत. १) भांडवलवृद्धी डोळ्यासमोर ठेऊन गुंतवणूक करणे आणि २) मूल्यांवर आधारलेली गुंतवणूक करणे आणि ती दीर्घ काळ सांभाळणे. दोन्ही पद्धती एकमेकांच्या विरोधात आहे. परंतु तरीसुद्धा अनेक पुस्तकांचे वाचन करून नरेन यांनी मूल्यांवर आधारित गुंतवणूक शैलीत प्राविण्य मिळवले आहे.
शंकरन नरेन यांना ‘कॉन्ट्रा इन्व्हेस्टर’ म्हणून सुद्धा म्युच्युअल फंड क्षेत्रात ओळखले जाते. या उद्योगात अनेक वाद-प्रवाद आहेत. गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाना गुंतवणूक करण्यासाठी आपला निधी दिल्यानंतर तो ताबडतोब गुंतवलाच पाहिजे. अशा विचारसरणीचे काही गुंतवणूकदार असतात. तर फंड मॅनेजरकडे गुंतवणूकीसाठी पैसा दिलेला आहे त्यामुळे योग्यवेळी योग्य गुंतवणूक निर्णय फंड मॅनेजरने घ्यायचा, असे मानणारेही आहेत. एकूण गुंतवणूकीच्या किती टक्के रक्कम शेअर्समध्ये गुंतवायची आणि किती टक्के रक्कम रोकड म्हणून ठेवायची हे निर्णय फंड मॅनेजरनेच घ्यावे. मग अशा वेळेस फंड मॅनेजरला बाजाराचा पी/ई रेशो अवास्तव वाटत असला तर निधीची गुंतवणूक करण्याऐवजी तो रोकड स्वरूपात ठेवला तरी चालेल, असा हा विचार प्रवाह आहे.
आणखी वाचा-Money Mantra : क कमॉडिटीचा : कडधान्य व्यापाऱ्यांची ‘ऐशीतैशी’; आत्मनिर्भरतेचा चंग
शेअर्सची निवड करण्यासाठी बॉटम ऑफ स्टॉक पिंकिंग तर टॉप डाउन पिंकिंग अशा पुन्हा दोन पद्धती आहेत. अशावेळेस नरेन मुख्य गुंतवणूक प्रमुख आहेत म्हणून आपली मते त्यांच्याकडे काम करणाऱ्या इतर फंड मॅनेजर्सवर ते लादत नाहीत. त्यांना पूर्ण गुंतवणूक स्वातंत्र्य दिलेले असते. काही वेळा योजनांमध्ये कामगिरीच्या बाबत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होतात. यावर नरेन यांचे म्हणणे असे आहे की, गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे.
गुंतवणुकीच्या क्षेत्रात पूर्ण वेळ असावे की नसावे? या प्रश्नांला उत्तर देताना पूर्णवेळ गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या गुंतवणूकदारापेक्षा जे गुंतवणूकदार पूर्णवेळ गुंतवणुकीच्या क्षेत्रात नाहीत ते जास्त पैसा कमावतात असे नरेन यांचे उत्तर आहे. नरेन यांचा हा मुद्दा अनेकांच्या लक्षात येत नाही. उगाचच अनेक गुंतवणूकदार आपला वेळ वाया घालवतात. या क्षेत्रात त्यांनी पार्ट टाइम गुंतवणूकदार असावे, यावर नरेन जास्त जोर देतात.
आणखी वाचा-Money Mantra : दिवस तुझे हे फुलायचे…
आयसीआयसीआय म्युच्युअल फंड शंकरन नरेन यांच्या नेतृत्वाखाली चांगली प्रगती करीत आहे. परंतु काही वेळा काही म्युच्युअल फंडाच्या योजना मागे पडतात. असे अनेक योजनांबाबत घडलेले आहे. परंतु एकूण सर्व बाबीचा विचार करता नरेन यांचे या क्षेत्रात भरपूर चाहते आहेत. कोणताही म्युच्युअल फंड व्यक्तींशी निगडित असावा की नियम-प्रथांच्या चौकटीत बांधलेला असावा या प्रश्नांला मात्र उत्तर नाही.
शंकरन नरेन हे कोणाला गुरुस्थानी मानतात? यांची नावे जर माहिती करून द्यायचे ठरविले तरी बेन्जामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, पीटर लिंच अशी अनेक नावे सांगता येतील. नरेन यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून अनुभवाचे बोल पुस्तक रूपाने यावे ही अपेक्षा.