गेल्या काही दिवसांतील कडवटपणाशी फारकत घेत, मंगळवारी शेअर बाजाराने सेन्सेक्सच्या ६५० अंशांच्या फेरमुसंडीसह, गुंतवणूकदारांच्या ओठावर गोडवा व चेहऱ्यावर हास्य निर्माण केले. पण हा गोडवा किती काळ सुरु राहिल? मकर संक्रांतीच्या दिवशी बाजारात उडालेले तेजीचे पतंग आणखी किती उंच भरारी घेतील? हे प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनी येणे स्वाभाविकच. सोमवारी जाहीर झालेल्या महागाई दरातील घसरणीच्या बातमीवर बाजाराने मंगळवारी सुखद प्रतिक्रिया दिली. जागतिक बाजारात दिसून आलेली उभारीही उत्साहदायी. बाजार निर्देशांकांनी टिकाऊपणे सकारात्मकत वळण घेण्यासाठी अशा दिलासादायी बातम्यांची मालिका यापुढे कितीदा व किती काळ दिसेल, यातून बाजाराचा आगामी कल ठरेल.
मंगळवारी बराच काळ उत्साही उभारीच्या आणि शेवटच्या तासाभरात नफावसुलीने अस्थिर बनलेल्या सत्रात, सेन्सेक्स १७० अंशांच्या भरपाईसह ७६,४९९ वर स्थिरावला. एकेसमयी त्यातील सुमारे सात शतकांची झेप टिकून राहू शकली नाही. त्याला मुख्यत: एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या व्यवस्थापनाचे आगामी काळासंबंधी निराशादायी समालोचन आणि त्या परिणामी आयटी समभागांतील घसरण कारणीभूत ठरली. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या साऱ्यांच्या भावाला त्यातून गळती लागली. राष्ट्रीय शेअर बाजाराची निफ्टीही ९० अंशांच्या कमाईसह २३,१७६ वर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकातील वाढ ही जेमतेम राहिली असली, तरी मिडकॅप निर्देशांकांतील दमदार २ टक्क्यांची वाढ ही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी निश्चितच सुखावह ठरली असेल.
हेही वाचा >>>डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता; परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
किरकोळ महागाई दर सरलेल्या डिसेंबरमध्ये ५.२ टक्के म्हणजेच चार महिन्यांच्या नीचांक पातळीवर ओसरल्याची बातमी ही बाजारातील सोमवारचे व्यवहार आटोपल्यानंतर आली. मुख्यतः खाद्यान्न आणि भाज्या व फळांच्या किमती खाली येणे हे या अंगाने दिलासादायी आहे. हा घसरणीचा क्रम त्यामुळे पुढेही सुरू राहण्याच्या आशा आहेत. मात्र दुसरीकडे महागाई दर घसरला असला तरी तो रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्के लक्ष्यापासून दूरच असल्याने फेब्रुवारीत अपेक्षित व्याजदर कपातीबाबत साशंकताही आहे. अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.४ टक्के असा दोन वर्षांच्या नीचांकी मंदावण्याचे अंदाज पाहता, विकासदराला उत्तेजन म्हणून व्याजदर कपात घडेल, असे आशावादी गृहितक बाजाराला तूर्त प्रेरक ठरत आहे.
निर्देशांकांची पुढील चाल काय?
निफ्टी निर्देशांक नजीकच्या अवधीसाठी तरी सकारात्मक वळणावर असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक रूपक डे यांनी केलेले आलेख वाचन सुचविते. डे यांच्या मते, निफ्टी जोवर २३,१३५ च्या वर टिकून आहे, तोवर त्याने २३,४०० पर्यंत झेप घेण्याची शक्यता दिसून येते. तथापि कंपन्यांची मिळकत कामगिरी तिसऱ्या तिमाहीत फारशी चांगली न राहण्याचे कयास आहेत. त्यातच ढेपाळलेला रुपया, खनिज तेलाच्या तापत असलेल्या किमती आणि अमेरिकेत परताव्याचे वाढते दर, मजबूत डॉलर आणि परकीय गुंतवणूकदारांचे वेगाने सुरू असलेली समभाग विक्री या प्रतिकूल घटकांची बाजारावरील छाया कायम आहे. त्यामुळे तेजीच्या पतंगांना काटले जाण्याचा धोकाही कायम आहे.
हेही वाचा >>>आयटीसीच्या शेअरच्या भावात घसरणीचे कारण काय? विलग झालेल्या हॉटेल व्यवसायाचे मूल्य अपेक्षेपेक्षा सरस
छंद, नाद, आकर्षण म्हणून शेअर बाजारात ओढले गेलेल्या नवगुंतवणूकदारांना, हा बाजार अकस्मात जालिम चटकेही देतो, याचा अनुभव सरलेल्या काही दिवसांत कदाचित त्यांना पहिल्यांदाच आला असेल. हे घाव केवळ तात्पुरते आणि जखमा लवकरच भरूनही निघतात. हेही मंगळवारच्या सेन्सेक्सच्या उसळीने दाखवून दिले. त्यामुळे ज्या वेगाने बाजाराचा ओढा, तितक्याच तडकाफडकी बाजाराचा नाद ज्यांना सोडला नाही तेच समंजस आणि त्यांचा सूज्ञ गुंतवणूकदार म्हणून बाजारात प्रवास सुरू झाला असे समजावे.
जाता जाता…
अलिकडच्या मोठ्या पडझडीनंतही शेअर बाजाराचे जोखीम-लाभ परिमाण वाईटच आहे, असे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या टिपणांने म्हटले आहे. बहुतेक शेअरचे मूल्यांकन अजूनही खूप जास्तच आहे, तर त्यांच्या कमाईच्या स्थितीत लक्षणीय सुधारही कठीण दिसत आहे. सारांशात, खरेदी केलेला शेअर स्वस्त की महाग हे चौथ्या तिमाहीतील त्या कंपनीची महसुली आणि नफ्याची कामगिरी पाहूनच ठरविले आणि खरेदीत चोखंदळ राहणेच इष्ट.