लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रथमच अनुक्रमे ८५,००० आणि २६,००० अंशांच्या सर्वोच्च शिखराला स्पर्श केल्यानंतर ते माघारी फिरले. निर्देशांकांनी विक्रमी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात विक्रीचा मारा केल्याने निर्देशांकात किरकोळ घसरण झाली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४.५७ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ८४,९१४.०४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३४.६२ अंशांची कमाई करत ८५,१६३.२३ या सर्वोच्च शिखराला स्पर्श केला. सेन्सेक्सने सलग तीन सत्रांत १००० अंशांची कमाई करत ८५,००० अंशांपुढे मजल मारली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये नगण्य वाढ झाली आणि तो २५,९४०.४० अंशांवर बंद झाला. त्याने २६,०११.५५ ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती.
अमेरिकी मध्यवर्ती बँकेने केलेल्या आक्रमक दर कपातीमुळे जगभरातील बाजारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. देशांतर्गत आघाडीवर सेन्सेक्स आणि निफ्टीदेखील नवीन उच्चांकी पातळीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, चिनी मध्यवर्ती बँकेची दर कपात आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केलेल्या अतिरिक्त प्रोत्साहन उपायांनी जागतिक गुंतवणूकदारांच्या भावनांवर सकारात्मक परिणाम केला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात धातू कंपन्यांचे समभाग उसळले. तर, ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) आणि बँकांच्या समभागांमध्ये नफावसुलीने घसरण झाली. नजीकच्या काळात फेडकडून आणखी दर कपात आणि रिझर्व्ह बँकेकडूनदेखील ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीत व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे परदेशी निधीचा ओघ वाढला आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्र बँक, इंडसइंड बँक, टायटन, नेस्ले, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सच्या समभाग घसरण झाली. तर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, टेक महिंद्र, एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग तेजीत होते.
सेन्सेक्स ८४,९१४.०४ -१४.५७ (-०.०१%)
निफ्टी २५,९४०.४० १.३५ ( ०.०२%)
डॉलर ८३.६५ ११
तेल ७५.६४ २.३५