मुंबई: भांडवली बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदवली आणि २०२३-२४ आर्थिक वर्षाला तेजीसह निरोप दिला. जागतिक बाजारातील तेजीच्या प्रवाहाचे अनुकरण करीत झालेल्या खरेदीने निर्देशांकांच्या उभारीला हातभार लावला. बुधवारी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवरील एस ॲण्ड पी ५०० निर्देशांकाने सार्वकालिन उच्चांक स्थापित करून विक्रमी पातळी गाठली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपयाच्या घसरणीनेही बाजारातील खरेदीपूरक उत्साह ओसरू शकला नाही आणि ऊर्जा, वाहन आणि धातू क्षेत्रातील समभागांना जोरदार मागणी दिसून आली. परिणामी बुधवारच्या तेजीची दौड आणखी विस्तारत, सेन्सेक्स ६५५.०४ अंशांनी (०.९० टक्के) वाढून ७३,६५१.३५ वर स्थिरावला. दिवसभरातील व्यवहारात, सेन्सेक्स १,१९४ अंशांनी उसळून, ७४ हजारांपल्याड झेपावला होता. पण सत्रअखेरीच्या व्यवहारात नफारूपी विक्रीने निर्देशांकाची उसळी जवळपास निम्म्याने ओसरली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २०३.२५ अंश (०.९२ टक्के) वाढून २२,३२६.९० वर दिवसअखेरीस बंद झाला.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 28 March 2024: सोनं खरेदी करणाऱ्यांना पुन्हा झटका, दरात पुन्हा वाढ, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?

साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स ८१९.४१ अंश आणि निफ्टी २३०.१५ अंशांनी वधारला आहे. शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’निमित्त सार्वजनिक सुटी असल्याने भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहतील. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील शेवटचे व्यवहार गुरुवारी आटोपले. मावळत्या २०२३-२४ आर्थिक वर्षात सेन्सेक्सने १४,६५९.८३ अंशांची (२४.८५ टक्के)  झेप घेतली आहे, तर निफ्टी निर्देशांक ४,९६७.१५ अंशांनी (२८.६१ टक्के) वधारला आहे.

सत्राच्या अखेरीस अस्थिरतेची बाधा होऊनही, भांडवली बाजाराने दिवसाच्या व्यवहाराची आणि आर्थिक वर्षाचीही आशावादी सांगता केली. कारण किरकोळ गुंतवणूकदार, म्युच्युअल फंडांसह, देशी संस्थागत गुंतवणूकदार आणि विदेशी संस्थागत गुंतवणुकदारांद्वारे सर्व श्रेणीतील समभागांमध्ये खरेदी वाढली. विशेषत: महिन्याच्या सुरुवातीपासून  विक्री अनुभवणारे मिड आणि स्मॉल-कॅप समभागांनी पुनरागमन केले आणि त्यांनीच मागणीत आघाडी मिळविल्याचे दिसून आले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. अल्प ते मध्यम कालावधीत, मिड-कॅप समभागांचे चढ्या मूल्यांकनामुळे व्यापक बाजाराच्या दृष्टीने चिंतेची स्थिती निर्माण होऊ शकते. तथापि बाजारासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन उत्साहवर्धकच आहे, असेही ते म्हणाले.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह सर्वाधिक ४ टक्क्यांनी वाढला, त्यानंतर नेस्ले, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो आणि महिंद्र अँड महिंद्र यांनी मूल्यवाढ साधली. याउलट टेक महिंद्र, ॲक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे समभाग पिछाडीवर राहिले.
उल्लेखनीय म्हणजे गुरुवारच्या व्यवहारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक क्षेत्रात स्थिरावले. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६२ टक्के आणि ०.३३ टक्क्यांनी वाढले.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market indices sensex and nifty registered gains print eco news amy