आशीष ठाकूर

गेल्या लेखात निफ्टी निर्देशांकाची वर्षभरातील वाटचालीचा विचार करता आपण निफ्टी निर्देशांकावर ५,३०० अंशांच्या मुसंडीच्या नितांत सुंदर अशा तेजीच्या दिवसांना ‘दिवस तुझे हे फुलायचे’ ही काव्यात्मक उपमा दिली होती. गेल्या पंधरा दिवसांत, निफ्टी निर्देशांक २१५०० ते २१,८०० या ‘चुंबकीय परिघात’ टिकून आहे, तर सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी २२,२९७ चा नवीन ऐतिहासिक उच्चांक त्याने नोंदवला. जसं सुरवंटाचं रूपांतर सुंदर फुलपाखरात होतं तसंच काहीसं या ‘फुलायच्या दिवसांच रूपांतर हे नवीन उच्चांकाच्या फुललेल्या क्षणांत झालं’ या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या या वाटचालीकडे वळूया.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ७३,१४२.८० / निफ्टी: २२,२१२.७०

निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीत २१,५०० ते २१,८०० हा स्तर ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ (टर्निंग पॉइंट) असून या स्तरावर निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल अवलंबून असेल. या वाक्याची प्रचीती आपण गेले तीन महिने कधी तेजीच्या वाटचालीतील अडथळा तर घसरणीतील भरभक्कम आधार म्हणून हा स्तर कार्यरत होता. जसं की २० डिसेंबरला २१,५९३ चा उच्चांक मारत दुसऱ्याच दिवशी हलकीफुलकी घसरण २०,९७६ पर्यंत झाली. पुढल्या तेजीच्या चढाईत २१,५०० चा अडथळा निफ्टी निर्देशांकाने लीलया पार केला आणि १ जानेवारीला २१,८३४ चा उच्चांक नोंदवला. १० जानेवारीला पुन्हा २१,४४८ चा नीचांक मारत त्या दिवशीचा निफ्टी निर्देशांकाचा बंद भाव २१,६१८ होता आणि हाच २१,५०० स्तराचा आधार निफ्टीच्या वाटचालीत भरभक्कम आधार ठरत आहे. जेव्हा निफ्टी निर्देशांकाने २ फेब्रुवारीला २२,१२६ चा उच्चांक नोंदवला, त्यानंतर जी काही घसरण झाली तेव्हा पुन्हा २१,५३० (१४ फेब्रुवारीचा नीचांक) हाच आधार ठरला. गेल्या तीन महिन्यांपासून वाचकांसाठी विकसित केलेला २१,५०० ते २१,८०० हा महत्त्वाचा परीघ वळणबिंदू ठरत, उच्चांकापासून जी काही हलकीफुलकी घसरण होते ती २१,५०० च्या चुंबकीय स्तरावर येऊन पुन्हा वरची उसळी मारत आहे.

हेही वाचा >>>Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे… निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २१,५०० चा स्तर राखल्यास या निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २१,५०० अधिक ३०० अंश २१,८००… २२,१००… २२,४००… २२,७०० असे असतील. येणाऱ्या दिवसांतील हलक्याफुलक्या घसरणीत निफ्टी निर्देशांकाला प्रथम २१,८०० आणि त्यानंतर २१,५०० हे भरभक्कम आधाराचे स्तर असतील. तेजीच्या मार्गावरील धोकादायक वळण हे निफ्टी निर्देशांकावर २२,३०० ते २२,८०० असेल. हा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरत असल्यास, निफ्टी निर्देशांकाच प्रथम खालचे लक्ष्य हे २१,५०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २०,२०० असे असेल.

शिंपल्यातील मोती आयटीसी लिमिटेड (शुक्रवार, २३ फेब्रुवारी भाव ४११.४० रु.)

गृहोपयोगी उत्पादन, कागद, हॉटेल, सिगारेट अशा विविध क्षेत्रांत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असणारी, आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे जागतिक स्तरावर आपली नाममुद्रा उमटवणारी, किंबहुना वित्तीय नियोजनाचा श्री गणेशा करण्यासाठी ज्या मोजक्या कंपन्या निवडल्या जातात त्यातील अग्रणी, जिची श्रेणी ही ‘कल, आज, कल’ म्हणजे आमच्या जन्माअगोदर (कल) आताच्या घडीला (आज) व उद्याच्या सोनेरी भविष्यासाठी असणारी (कल) अशा मोजक्या कंपनीत मोडते, त्या क्रमवारीत अग्रस्थानी असणारी ‘आयटीसी लिमिटेड’ या कंपनीचा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षांतील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री १७,१२२ कोटींवरून १७,४८३ कोटी, करपूर्व नफा ६,६७८ कोटींवरून ६,७२५ कोटी रुपये, तर निव्वळ नफा ५,०३१ कोटींवरून ५,५७२ कोटी रुपये झाला आहे. आयटीसी लिमिटेड या समभागाचे आलेख वाचन करता, समभागाने आपल्याभोवती ३७५, ४००, ४२५ असा २५ रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केलेला आहे. ४०० ते ३५० रुपयांदरम्यानच्या प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत हा समभाग खरेदी करावा. समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे ४५० ते ४७५ रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य ५५० रुपये असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ३४० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

हेही वाचा >>>Money Mantra : मार्ग सुबत्तेचा दूरदृष्टीचे ‘ॲसेट ॲलोकेशन’

(महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.)

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची

हल्ली कामाच्या धकाधकीत गुंतवणूकदारांना इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे (पोर्टफोलिओकडे) लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही व त्यात कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल हे महत्त्वाचे वळणबिंदू असल्याने आणि त्यात हल्ली होतं काय तर कंपनीचे तिमाही निकाल नितांत सुंदर पण ते जाहीर झाल्यावर, त्या कंपनीच्या समभागाचा भाव गडगडतो. याच्याबरोबर उलट जाहीर झालेला वित्तीय निकाल निराशाजनक पण भांडवली बाजारातील समभागाच्या किमतीत तात्पुरती अल्पशी अशी घसरण होऊन नंतर भरीव सुधारणा होते, मग खरं काय? या गोंधळाच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या पैशांची हेळसांड होऊ नये म्हणून गुंतवणूकदारांसाठी तांत्रिक विश्लेषण, मूलभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसीस) यामधील सोनेरी संकल्पना (गोल्डन रूल) एकत्र करून, त्यावर अभ्यास करून गुंतवणूकदारांसाठी साधी, सोपी अशी ‘निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली. प्रत्यक्ष निकालानंतर समभागाचा बाजारभाव ‘महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरा’वर पाच दिवस टिकण्यास यशस्वी ठरल्यास जाहीर झालेला निकाल चांगला, तो समभाग राखून ठेवावा अथवा अल्पमुदतीसाठी खरेदी करून नमूद केलेले लक्ष्य साध्य झाल्यावर नफारूपी विक्री करावी. निकालानंतर समभागाचा भाव ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास अयशस्वी ठरल्यास, समभागाच्या खरेदीपासून काही काळ दूर राहावे. गुतंवणूकदारांसाठी विकसित केलेली ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर संकल्पना’ काळाच्या कसोटीवर उतरली का? व त्याची चिकित्सा ‘हा सूर्य हा जयंद्रथ’ या न्यायाने होणे गरजेचे आहे.

या स्तंभात १२ फेब्रुवारीच्या लेखात ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड’ या समभागाचा निकालपूर्व आढावा घेतलेला होता. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही १३ फेब्रुवारी होती. ९ फेब्रुवारीचा बंद भाव ५९१ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ५७५ रुपये होता, निकालापश्चात निराशाजनक परिस्थितीत ५५० रुपयांचे खालचे लक्ष्य नमूद केलेले. निकालाबरोबरच संचालक मंडळानी अमेरिकेस्थित हिंडाल्कोची उपकंपनी ‘नोविलीस’चा प्रकल्प विस्तार हा नियोजित वेळेत न होता, एक वर्ष विलंबाने होत असून ठरलेल्या रकमेपेक्षा ६५ टक्के अधिक रकमेची तरतूद करावी लागेल हे संचालक मंडळाचे निवेदन प्रसिद्ध झाल्यावर हिंडाल्कोने ५७५ रुपयांचा निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत त्या दिवशीच हा समभाग ४९६ रुपयांपर्यंत खाली घसरला. अशा रीतीने निकालापश्चात होणारे संभाव्य नुकसान वाचवण्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर संकल्पना उपयोगात आली. हिंडाल्को लिमिटेडचा आताचा म्हणजे शुक्रवार, २३ फेब्रुवारीचा बंद भाव ५१८ रुपये आहे. (क्रमशः)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.\ashishthakur1966@gmail.com

(अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Story img Loader