मुंबई : भांडवली वस्तू, बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभाग गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने २०२२ सालातील कामकाज झालेल्या अखेरच्या दिवशी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर स्थिरावले. सेन्सेक्सने शुक्रवारी चालू वर्षांतील अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी ६१,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी मोडली, तर दुसरीकडे निफ्टी मात्र १८,०००च्या पातळीवर तग धरून राहू शकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९३.१४ अंशांनी (०.४८ टक्के) घसरून ६०,८४०.७४ पातळीवर बंद झाला. वर्षांच्या अखेरच्या सत्राची सुरुवात मात्र निर्देशांकांनी सकारात्मक केली होती. सत्रातील बहुतांश काळ तेजीवाल्यांचा बाजारावर पगडा राहिला. मात्र अखेरच्या तासाभरात विक्रीचा मारा वाढला आणि मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा मिळविला. सेन्सेक्सने २५८.८ अंशांची कमाई करत ६१,३९२.६८ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८५.७० अंशांची (०.४७ टक्के) घसरण झाली आणि तो १८,१०५.३० पातळीवर स्थिरावला.

नवीन वर्षांतील संभाव्य मंदीच्या भीतीने वर्षांअखेरच्या सत्रात गुंतवणूकदार चिंतेत राहिले. उच्च व्याजदर आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे सध्या सुरू असलेली अस्थिरता नजीकच्या काळातदेखील कायम राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे नवीन वर्षांत गुंतवणूकदारांनी समभागांचे वाजवी मूल्य, स्थिर कमाई आणि मजबूत मागणी असलेल्या कंपन्यांच्या समभागांवर लक्ष केंद्रित करणे हितावह ठरेल, असा मोलाचा सल्ला जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी दिला.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी, आयटीसी, नेस्ले, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एशियन पेंट्स, मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्र, पॉवर ग्रिड आणि इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर बजाज फिनसव्‍‌र्ह, टायटन, बजाज फायनान्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, विप्रो, कोटक मिहद्र बँक, टेक मिहद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक यांचे समभाग तेजीत व्यवहार करत स्थिरावले.

गुंतवणूकदार १६.३८ लाख कोटींनी श्रीमंत

भू-राजकीय अनिश्चितता आणि महागाईची चिंता असतानाही भांडवली बाजाराने २०२२ सालात नवीन उच्चांक गाठल्यामुळे गुंतवणूकदारांना १६.३८ लाख कोटींनी श्रीमंती या वर्षांत अनुभवता आली. जगभरातील इतर भांडवली बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजाराची कामगिरी चांगली झाली आहे.

निर्देशांकांकडून वर्षांत जेमतेम ५ टक्के परतावा

सेन्सेक्सने मावळते वर्ष २०२२ मध्ये २,५८६.९२ अंशांची कमाई करत केवळ ४.४४ टक्के परतावा दिला, तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील वर्षभरात ७५१.२५ अंशांची वाढ झाली आणि त्याने ४.३२ टक्के परतावा दिला. भांडवली बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी एकेरी अंकातील परतावा दिला असून तो सध्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याजापेक्षादेखील कमी राहिला आहे. आधीच्या वर्षांत म्हणजेच २०२१ मध्ये सेन्सेक्सने १०,५०२.४९ अंशांची कमाई करत २१.९९ टक्क्यांचा दणदणीत परतावा दिला होता. सेन्सेक्सने ४.४४ टक्के वार्षिक परतावा देऊनदेखील जगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा निर्देशांक ठरला आहे.विद्यमान वर्ष २०२२ मध्ये सेन्सेक्सने १७ जूनला ५०,९२१.२२ ही वर्षभरातील नीचांकी पातळी गाठली होती. तर चालू महिन्यात १ डिसेंबरला ६३,५८३.०७ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market news sensex ends over 293 points lower on last trading day zws