मुंबई: जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तेजीने सुरुवात करून, दिवस सरता सरता बाजाराला पुन्हा निराशेने घेरले. विशेषत: रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात व्याजदर वाढीचे समर्थन केल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली. व्याजदर वाढीला अकालीपणे विराम देणे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे आहे, अशा गव्हर्नरांच्या भूमिकेवर विपरीत पडसाद उमटले.
गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांकानी तेजीसह व्यवहारास सुरुवात केली. मात्र उत्तरार्धात अस्थिरता वाढत गेल्याने दिवसअखेर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ६१,००० अंशांची भावनिकदृष्टय़ा महत्त्वाची पातळी सोडली. दिवसअखेर निर्देशांक २४१.०२ अंशांच्या घसरणीसह ६०,८२७.२२ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने एकेसमयी ४३० अंश गमावत ६०,६३७.२४ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७१.७५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,२५१ पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी कंपन्यांकडून आगामी काळात चांगली कामगिरीची आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा आत्मविश्वास आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर मंदीची भीती देखील काहीशी ओसरल्याने अमेरिकेसह जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र देशांतर्गत पातळीवर आगामी काळात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढ सुरूच राहण्याचे संकेत मिळाल्याने आशावाद मावळला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, बजाज फिनसव्र्ह, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक आणि एनटीपीसी या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एशियन पेंट्स, कोटक महिंद्र बँक, सन फार्मा आणि भारती एअरटेलचे समभाग तेजीत विसावले.