भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ पुढे आव्हान होते ते कशा प्रकारे नफा कमवला हे सिद्ध करण्याचे. याचे उदाहरण देताना ‘सेबी’ने १० जून २०२० ला अल्पेश आणि त्याच्या भावाने विकत घेतलेल्या समभागांचे उदाहरण दिले आहे. या दोघांनी मिळून एका कंपनीचे साडेबारा हजार समभाग विकत घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या समभागाचा ‘आवाज’ आपल्या कार्यक्रमात द्यावा अशी विनंती केली. ज्याला पंड्याने ९ वाजून ९ मिनिटांनी दुजोरा दिला आणि ९ वाजून ३५ मिनिटांनी आपल्या कार्यक्रमात प्रेक्षकांना ‘आवाज’ दिला. मग काय, अल्पेश आणि त्याच्या भावाने पुढच्या २ मिनिटांमध्ये सगळे समभाग विकून टाकले आणि १२ वाजता ‘९ टक्के भागा’ असा लघुसंदेश सुद्धा पाठवला. कारण दूरचित्रवाणीवरील आवाजानंतर त्या समभागात चांगलीच तेजी आली. या समभागातून ११ जूनला सुमारे ६ लाख तर आदल्या दिवशी दुसऱ्या एका समभागातून असेच अजून ६.५ लाख अल्पेश आणि त्याच्या भावाने कमावले. असेच या दोन दिवसांच्या आसपास वेगवेगळ्या समभागांवर बरेच पैसे कमावण्यात आले.
काही उदाहरणे अशी सुद्धा देण्यात आली आहेत की, जिथे अल्पेश स्वतः कार्यक्रमात येऊन एखादा समभाग विकत घ्या असे सांगत आहे आणि तेच समभाग त्याने आधीच घेऊन ठेवले आहेत आणि आपल्या कार्यक्रमानंतर ते विकून नफा कमावला. पंड्याने असा बचाव केला की, त्याने सुचवलेले समभाग हे दूरचित्रवाणीच्या अंतर्गत संशोधनातून असतात, जे आदल्या दिवशी त्यांना मिळतात. पण ‘सेबी’ने ते देखील सिद्ध केले. ‘सेबी’ने हेसुद्धा सांगितले की, कसे पंड्याने तो कार्यक्रम सोडल्यावर अल्पेशनेसुद्धा सामाजिक माध्यमांवर नवीन दूरचित्रवाणीवर जाण्याचे जाहीर केले. या दोघांनी असे देखील सांगण्याचा प्रयत्न केला की, नेहमीच फायदा झालेला नाही तर कधीतरी नुकसानसुद्धा होते. यात ‘सेबी’ने चक्क पोकर या कॅसिनोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पत्त्यांच्या खेळाचे उदाहरण दिले आहे. पोकरमधील सगळ्यात जास्त कमावून देणारी बोली म्हणजे रॉयल फ्लश. घोटाळा करणारा ते सगळे पत्ते चिन्हांकित करतो आणि त्याच्या मित्राकडे देतो. जो हे पत्ते वाटतो खेळायला जाण्याच्या आधीच त्याला माहित असते की, रॉयल फ्लशचे पत्ते कुठे आहेत. त्यामुळे त्याची बोली लागली नाही तरी खेळायला जाताना त्याचा उद्देश खेळात घोटाळा करणे हाच असतो. इथे ही तेच झाले असे ‘सेबी’चे म्हणणे होते.
हेही वाचा: माझा पोर्टफोलियो : अचल मालमत्तांचे चलनी लाभ मोठे!
अल्पेशने फक्त या चौकशीच्या काळात म्हणजे मे २०२० ते सप्टेंबर २०२१ मध्ये बावन्न लाख रुपये बँक खात्यातून रोख काढले. याचे उद्दिष्ट काहीही असले तरी ‘सेबी’च्या म्हणण्यानुसार वरील गुन्हे महत्त्वाचे आहेत आणि त्याचा दोघांच्या आर्थिक देवाणघेवाणीशी काहीही संबंध नाही. अशाप्रकारे अल्पेश आणि त्याच्या संबंधितांनी सुमारे १०.७३ कोटींचा नफा या काळात कमावला. ‘सेबी’ने आपल्या आदेशात हा नफा १२ टक्के साध्या व्याजदराने गुंतवणूकदारांचे सरंक्षण आणि शिक्षण फंडात जमा करायला सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त सर्वांना मिळून २.६० कोटींचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला.
हेही वाचा: पुस्तके वाचणारा शेअर दलाल : मोतीलाल ओसवाल
पण या ‘बेगानी शादी मे एक अब्दुल्ला दिवाना’ होता. या अब्दुल्लाचे नाव होते ओपू फुनीकांत नाग. हा नुसताच दिवाना नव्हता तर घसघशीत नफ्यात सुद्धा होता. हा अल्पेशकडे कारकून म्हणून काम करायचा आणि पगारवाढीची मागणी करायचा. अल्पेशने त्याला पगारवाढी ऐवजी शेअरच्या टीप देऊ केल्या आणि महिन्याला अवघे १५ हजार रुपये कमावणाऱ्या ओपूने चक्क सव्वा दहा लाखांचा नफा कमावला ते सुद्धा स्वतःच्या भांडवलातून! ‘सेबी’ने मात्र त्याला संशयाचा फायदा देत काही दंड केल्याचे आढळत नाही. मात्र नफा व्याजासकट परत करण्यास सांगितले आहे. कारण तो अल्पेशच्या माहितीवर सगळे करत होता आणि अल्पेशच्या गुन्ह्यांपासून तो अनभिज्ञ होता. तेव्हा दूरचित्रवाणीवर जर काही सल्ले ऐकून गुंतवणूक करत असाल तर सावध राहा. कारण तुमच्या खरेदीवर दुसऱ्याची विक्री अवलंबून असू शकते त्यामुळे स्वतःचाच ‘आवाज’ ऐका.