मुंबई: युरोपीय बाजारातील कमकुवत कल आणि देशांतर्गत बाजारात बँकांसह रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या अग्रणी समभागात मोठी घसरण झाल्याने मंगळवारी प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्यांहून अधिक घसरगुंडी अनुभवास आली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे मोठय़ा प्रमाणावर निर्गमन सुरू असल्याने त्याचा भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ६३१.८३ अंशांनी म्हणजेच १.०४ टक्क्यांनी घसरून ६०,११५.४८ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान ८०८.९३ अंश गमावत सेन्सेक्सने ६० हजारांची महत्त्वपूर्ण पातळीही सोडत, ५९,९३८.३८ या अशा नीचांकाला लोटांगण घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८७.०५ अंशांची (१.०३ टक्के) घसरण झाली आणि तो १८ हजारांखाली १७,९१४.१५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हकडून अर्ध्या टक्क्यांहून अधिक व्याजदर वाढीची शक्यता असली तरी यानंतर काही काळ तिच्याकडून व्याजदर वाढीला विश्रांती दिली जाण्याचे कयास व्यक्त केले जात आहेत. देशांतर्गत पातळीवर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीची सुरुवात अपेक्षेनुरूप न केल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. गुरुवारी महागाईच्या आकडेवारीसह फेडरल रिझव्र्हच्या भविष्यातील योजनांबद्दल स्पष्टता येईल, तोवर वाट पाहण्याची गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून येते, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
रुपयाला मात्र ५७ पैशांचे बळ
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी ५७ पैशांनी वधारून ८१.७८ पातळीवर बंद झाला. ११ नोव्हेंबरनंतर डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली ही एका सत्रातील सर्वात मोठी वाढ आहे. चलन बाजार विश्लेषकांच्या मते, आशियाई चलनांमध्ये रुपयाची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती आणि आता रुपयाला ८१.७० या पातळीचा आधार आहे. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८२.२० पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात ८१.७२ ची उच्चांकी तर ८२.२६ या नीचांकी पातळीला स्पर्श केला.