मुंबई : मध्यवर्ती बँकेने सलग नवव्यांदा रेपो दर आहे त्या पातळीवर कायम ठेवल्याने भांडवली बाजाराने गुरुवारी त्यावर नाराजीची प्रतिकिया दिली. प्रमुख निर्देशांक १ टक्क्याहून अधिक घसरले. खाद्यान्न महागाई दर अधिक राहिल्याने किरकोळ महागाई दर जून महिन्यात ५ टक्क्यांपुढे सरसावला असून, त्या घटकाबाबत सावधतेवर रिझर्व्ह बँक ठाम आहे.
एकंदर व्यवहारकल नकारात्मक राहिलेल्या सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८१.७९ अंशांनी घसरून ७८,८८६.२२ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६६९.०७ अंश गमावत ७८,७९८.९४ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८०.५० अंशांची घसरण झाली आणि तो २४,११७ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> ‘एलआयसी’चा तिमाही नफा १० टक्के वाढीसह १०,४६१ कोटी रुपयांवर
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी अपेक्षेनुसार आपली भूमिका कायम ठेवत रेपो दर ६.५ टक्क्यांवर जैसे थे राखला आहे. खाद्यान्न महागाई दराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसून त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
किरकोळ महागाई दर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सावधगिरी बाळगून सध्याच्या धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील ३० आघाडीच्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टाटा स्टीलच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर या घसरणीत टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयटीसी, इंडसइंड बँक आणि ॲक्सिस बँकेचे समभाग तेजीत होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी ३,३१४.७६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ७८,८८६.२२ -५८१.७९ (-०.७३%)
निफ्टी २४,११७ -१८०.५० (-०.७४%)
डॉलर ८३.९६ १ पैसा
तेल ७७.८३ -०.६६
व्याजदराशी निगडित कंपन्यांच्या समभागात घसरण
व्याजदराबाबत संवेदनशील क्षेत्र असलेल्या गृहनिर्माण, बँका आणि वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुरुवारी मुख्यत: घसरण झाली. रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम असल्याने बँकांची कर्जे महागलेलीच राहणार आहे. याचा परिणाम घरे, वाहन खरेदी आणि बँकांकडून होणाऱ्या कर्ज मागणीवर होण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या सत्रात गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित गोदरेज प्रॉपर्टीजचे समभाग ३.२९ टक्के, मॅक्रोटेक डेव्हलपर्स २.३८ टक्के, महिंद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स २.१७ टक्के, शोभा लिमिटेड १.७५ टक्के, डीएलएफ १.४९ टक्के, ओबेरॉय रिॲल्टी १.४७ टक्के आणि ब्राइडे एंटरप्राइजचे १.१२ टक्क्यांनी घसरले. एकंदर बीएसई रिॲल्टी निर्देशांक १.२२ टक्क्यांनी घसरून ७,८६२.७६ वर स्थिरावला. वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये टीव्हीएस मोटर कंपनी १.८६ टक्के, अपोलो टायर्स १.६८ टक्के, बॉश १.६४ टक्के, हीरो मोटोकॉर्प १.४६ टक्के, मारुती १.२७ टक्के, आणि बजाज ऑटोचा समभाग ०.५८ टक्क्यांनी घसरला. बीएसई ऑटो निर्देशांक ०.३४ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीने ५६,३७७.११ पातळीवर बंद झाला. बँकांच्या समभागांमध्ये बँक ऑफ बडोदा ०.९७ टक्क्यांनी, कॅनरा बँक ०.८८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.७० टक्के, कोटक महिंद्र बँक ०.४२ टक्के आणि स्टेट बँक ०.१८ टक्क्यांच्या घसरणीने बंद झाला.