मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि वित्त कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे शुक्रवारी सकारात्मक सुरुवात करूनही भांडवली बाजाराला दिवस सरतासरता पुन्हा मंदीने घेरले. सलग तिसऱ्या सत्रातील घसरणीने प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ला पुन्हा ६० हजारांखाली रोडावला आहे.
सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५२.९० अंशांनी घसरून ५९,९००.३७ पातळीवर बंद झाला. सत्रारंभी सेन्सेक्सने ६०,५३७.६३ या सत्रातील उच्चांकी पातळीपर्यंत मजल मारली होती. पण तेथून तब्बल ६८३.३६ अंश गमावून त्याने ५९,६६९.९१ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३२.७० अंशांची घसरण झाली आणि तो १७,८५९.४५ पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हच्या पतधोरण समितीच्या बैठकीत विद्यमान २०२३ मध्ये महागाई नियंत्रणासाठी अजूनही मोठय़ा दरकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. त्या परिणामी गुंतवणूकदारांनी सावधगिरीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र येत्या काळात अमेरिकी रोजगारवाढीची आकडेवारी उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. ज्याचा सकारात्मक परिणाम अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हच्या पतधोरणावर पडण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीमुळे बाजारातील वातावरण अधिक नकारात्मक बनले आहे. त्यात भर म्हणून येत्या आठवडय़ात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थिक तिमाहीची आकडेवारी जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच गुंतवणूकदारांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नफावसुलीला प्राधान्य दिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, बजाज फिनसव्र्ह, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस आणि टाटा मोटर्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, आयटीसी आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) समभाग विक्रीचा मारा कायम असून गुरुवारच्या सत्रात त्यांनी १,४४९.४५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.