मुंबई : जागतिक मंदीसंबंधी चिंता गहिरी बनल्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदूस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागांमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. परिणामी, सकाळच्या सत्रात सकारात्मक पातळीवर असलेल्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी दिवसाच्या उत्तरार्धात नकारात्मक वळण घेत मोठय़ा घसरणीसह बंद झाले.
शुक्रवारी, सेन्सेक्स २३६.६६ अंशांनी घसरून ६०,६२१.७७ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २० कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दरम्यानच्या सत्रात सेन्सेक्सने २७३.१८ अंश गमावत ६०,५८५.२५ या दिवसभरातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीमध्ये ८०.२० अंशांची घसरण झाली आणि तो १७,०२७.६५ पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी भांडवली बाजारातील घसरणीकडे दुर्लक्ष करत, चीनमधील करोना वातावरण निवळत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक आशावादामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते. मात्र जागतिक मंदीच्या भीतीने भांडवली बाजाराचा मूडपालट होऊन पुन्हा त्याने नकारात्मक पातळीत प्रवेश केला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.