Share Market Closed Today: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या नजरा अयोध्येकडे लागल्या आहेत. अनेक राज्य सरकारांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. यानिमित्ताने आज सोमवार २२ जानेवारी रोजी शेअर बाजारही बंद आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठानिमित्त देशांतर्गत शेअर बाजारालाही सुट्टी देण्यात आली आहे.

…म्हणून आज बाजाराला सुट्टी

बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख देशांतर्गत शेअर बाजारांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी याबाबत माहिती दिली होती. अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्र सरकारने सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याची माहिती दोन्ही शेअर बाजारांनी दिली होती. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद आहेत. आज सूचीबद्ध होणारा मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेसचा आयपीओ आता २३ जानेवारी रोजी पुन्हा सूचिबद्ध होणार आहे. आयपीओसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी रोजी संपुष्टात आली आणि अंतिम आयपीओची किंमत ४१८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली. तसेच आयपीओला १६.२५ वेळा बोली मिळाल्या. शनिवार २० जानेवारी रोजी शेअर बाजाराचे विशेष ट्रेडिंग सत्र होते, जेव्हा शेअर बाजारातील निफ्टी २१,६०० च्या खाली बंद झाला.

हेही वाचाः अयोध्येच्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसंदर्भात गौतम अदाणींचे ट्वीट, म्हणाले…

शनिवारी संपूर्ण शेअर बाजाराच्या व्यवहाराचे सत्र झाले

दोन्ही देशांतर्गत बाजारात सोमवारऐवजी शनिवारी व्यवहार झाले. यापूर्वी शनिवारी बीएसई आणि एनएसईवर केवळ आपत्कालीन विशेष सत्र होत होते. परंतु शेअर बाजाराने सोमवारची सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याऐवजी शनिवारी पूर्ण सत्र आयोजित केले गेले. शनिवारच्या सत्रात कमोडिटी आणि चलन विभागांमध्ये कोणतेही व्यवहार झाले नाहीत, परंतु इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागांमध्ये पूर्ण सत्र झाले.

हेही वाचाः आता टाटांच्या ‘या’ कंपनीत होणार नोकर कपात; ३ हजार जणांचे रोजगार जाणार

या विभागांमधील व्यापार होणार नाहीत

आज कोणत्याही सेगमेंटमध्ये कोणताही व्यापार होणार नाही. आज फक्त कमोडिटी विभागातच व्यवसाय होईल, पण तोही पूर्ण होणार नाही. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX आणि नॅशनल कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच NCDEX सकाळच्या सत्रासाठी बंद आहेत. याचा अर्थ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांमध्ये कोणताही व्यापार होणार नाही. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून सत्रातील व्यवहार सुरू होतील.

अगदी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुट्टी

या आठवड्यावर सुट्ट्यांचा मोठा प्रभाव पडत आहे. जिथे गेल्या आठवड्यात ६ दिवस बाजारात व्यापार होता, तिथे या आठवड्यात फक्त ३ दिवस व्यवहार होणार आहेत. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार बंद आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे शुक्रवार २६ जानेवारी हा सुट्टीचा दिवस आहे. अशा स्थितीत मंगळवार, बुधवार आणि गुरुवारीच बाजारात व्यवहार होणार आहेत.