-प्रमोद पुराणिक
अमेरिकी भांडवल बाजाराविषयी जाणायचे तर टी. बून पिकन्स या व्यक्तीचा आणि त्यांच्या कार्यप्रतापांचा आढावा घेतलाच गेला पाहिजे. २२ मे १९२८ ला होल्डन व्हिले ओकला होमा या ठिकाणी जन्माला आलेल्या टी. बून पिकन्सने ११ सप्टेंबर २०१९ ला टेक्सास डलास या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला. या माणसाचे एकंदर आयुष्यच सनसनाटी आहे. १२ व्या वर्षी या माणसाने वर्तमानपत्रे टाकण्याचे काम सुरू केले. वर्तमानपत्रांची संख्या त्याने २८ वरून १५६ पर्यंत वाढवली.
“व्यवसायाची वाढ कशी करायची असते याचे शिक्षण दररोज वितरित केल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांची वाढ करून मला मिळाले,’’ असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा आश्चर्य वाटते. पण जगातली तेल उद्योगाची कहाणी त्याने सुरू केली. ‘तेल उत्खनन करणाऱ्या व्यक्ती इतका आशावादी जगात दुसरा कोणीही नसतो,’ हे त्याने लिहिलेले वाक्य आणि त्याचा अर्थ हा त्याच्याच आयुष्याचा प्रवास बघितला की लक्षात येते. ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी आणि ए अँड एम युनिव्हर्सिटी या ठिकाणी त्याचे शिक्षण झाले. भूगर्भशास्त्राचा हा पदवीधर. १९५१ ला पदवी मिळाल्यानंतर, १९५४ पर्यंत फिलिप्स पेट्रोलियम या अमेरिकी कंपनीमध्ये त्याने नोकरी केली. १९५६ ला वाइल्ड कटर म्हणून काम सुरू केले. नंतर या कंपनीचे नाव मेस पेट्रोलियम झाले आणि १९८१ पर्यत जगातली ती एक मोठी कंपनी बनली.
आणखी वाचा-बाजारातली माणसं: ना हर्ष, ना खेद !
मुंगीने पर्वत गिळावा त्याप्रमाणे ३० पट मूल्याने मोठी कंपनी या माणसाने आपल्या ताब्यात घेतली. आणि मग त्याचे कंपन्या ताब्यात घ्यायचे प्रयत्न निरंतर सुरूच राहिले. आत्मचरित्रात तो असे लिहितो की, “जेव्हा तुम्ही हत्तीचा पाठलाग करता, तेव्हा सशाचा पाठलाग करण्याकडे चित्त विचलित करू नका. मी कंपन्यांवर धाडी घालणारा लुटारू नाही. तर मी कंपन्यांचे मूल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणारा चळवळ्या माणूस आहे.”
दहा वर्षे गल्फ ऑईलचा शेअर फक्त ३३ डॉलर्स आणि आसपास होता. मात्र याने त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मग ते शेअर्स विकले तेव्हा भाव ८० डॉलर्सला पोहोचला होता. त्याच्या वडिलांकडून त्याच्या रक्तात जुगारी वृत्ती आली असावी, तर आईकडून विश्लेषण करण्याच्या सवयीची देणगी त्याने मिळवली. अमेरिकेत ग्रीन मेल यावर या काळात खूप टीकासुद्धा झाली. भागधारकांच्या हक्कासाठी सतत लढणारा बाजारातील माणूस म्हणून त्याला खरे तर ओळखले जावे. तो म्हणतो – अनेक कंपन्यांचे व्यवस्थापक स्वतःला कंपन्यांचे मालक समजतात परंतु कंपनीचे खरे मालक भागधारक असतात. या भागधारकांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे काम व्यवस्थापकांनी करायलाच हवे.
या ठिकाणी २००८ ला घडलेल्या एका दुसऱ्या प्रसंगाची आठवण करून द्यायलाच हवी. अमेरिकन वाहन उद्योग अडचणीत आला होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे अध्यक्ष गेल्यानंतर, ‘तुम्ही कसे आलात’ असा एक साधा प्रश्न अध्यक्षांनी विचारला. प्रत्येक जण स्वतंत्र स्वतःच्या जेट विमानाने अध्यक्षांकडे आल्याचे त्यांच्या उत्तरातून समजले. वाहन उद्योगासाठी सरकारने मदत करावी यासाठी गाऱ्हाणी घेऊन आलेली ही मंडळी होती म्हणे !
आणखी वाचा-बाजारातील माणसं : व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती!
टी. बून पिकन्स याने बी. पी. कॅपिटल मॅनेजमेंट नावाचा हेज फंडसुद्धा स्थापन केला. या माणसाने काय करावे तर शिकागो मर्कन्टाइल एक्सचेंजला फ्युचर डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्ट म्हणून जनावरेसुद्धा विकली. सुरुवातीला क्षेत्र बदल म्हणून पैसा कमावला. परंतु क्षेत्र बदल करणे चुकीचे होते. ही चूक ओळखण्याची आणि ती प्रांजळपणे मान्य करण्याची ताकदसुद्धा त्याच्यात होती. खनिज तेल, पाणी, गॅस आणि विंड फार्मर्स असे पुढे जाऊन त्याने वेगवेगळ्या व्यवसायाच्या वेगळ्या कंपन्या केल्या. अमेरिकेने तेल उत्पादनात स्वावलंबी व्हावे, आखाती देशांवर अवलंबून राहू नये. हे सांगणारा अमेरिकेतील तेल उद्योगातला तो पहिला उद्योजक होता.
‘मरावे परी देणगी रुपये उरावे’ या हेतूने २००६ ला त्याने टी.बून पिकन्स फाउंडेशनची स्थापना केली. आपल्यासारखे अमेरिकेत नाही. त्यामुळे अनेक उद्योजक अमेरिकेतल्या पक्षांना त्यांच्या अध्यक्षपदांच्या उमेदवाराला खुला पाठिंबा देतात. टी. बून पिकन्स रिपब्लिकन पार्टीचा देणगीदार होता. जॉर्ज बुश यांच्या उमेदवारीचा पाठीराखा होता. या माणसाने १९८६ ते १९९३ या कालावधीत युनायटेड शेअर होल्डर असोसिएशनची स्थापना केली . कंपन्यांचा कारभार कसा असावा याविषयी प्रभाव पाडणारा माणूस म्हणूनसुद्धा त्याचे नाव घेतले जाते. जुलै १९९९ ला जशी आपल्याकडे ‘सेबी’ ही संस्था आहे, तशी अमेरिकेत एसईसी (सिक्युरिटी एक्सचेंज कौन्सिल) ही संस्था आहे. त्या संस्थेने त्या काळात ‘एक शेअर, एक मत’ हा नियम केला.
या माणसाने अनेक पुस्तके लिहिली. २००८ साली १ ) दि फर्स्ट बिलियन इज दि हार्डेस्ट २) रिफ्लेक्शन ऑन अ लाईफ ऑफ कम बॅक्स अँड अमेरिकाज् एनर्जी फ्युच्यर अशी त्याने पुस्तके लिहिली. क्लीन एनर्जी कॉर्पोरेशन या कंपनीच्या शेअर्सची विक्री केली. गुंतून राहा, कामात समरस व्हा, आणि अखेरपर्यंत सतत कार्यरत राहा असे तो म्हणायचा. आपले आत्मचरित्र तसेच आठवणींवरही त्याने पुस्तके लिहिली.
आपण अलीकडेच इवान बोस्की यावर स्तंभ लिहिला होता. बोस्की आणि टी. बून पिकन्स या दोघांचे अतिशय चांगले संबंध होते. परंतु तरीसुद्धा दोघांच्या पद्धतीमध्ये खूपच फरक होता. त्यामुळे भारतात बोस्की नको पण अनेक टी. बून पिकन्स हवे आहेत. कारण आपल्याकडेसुद्धा कंपन्यांना आणि त्यांच्या व्यवस्थापकांना हादरून सोडणारा माणूस हवा आहे असे वाटते.