अजय वाळिंबे
वर्ष १९७६ मध्ये स्थापन झालेली तेगा इंडस्ट्रीज ही जागतिक खनिज / खाणकाम आणि बल्क सॉलिड्स हाताळणी उद्योगासाठी विशेषीकृत उत्पादनांची एक अग्रगण्य उत्पादक आणि वितरक आहे. जागतिक स्तरावर, तेगा इंडस्ट्रीज ही पॉलिमरवर (बहुवारिक) आधारित मिल लाइनरचे दुसरी सर्वात मोठी उत्पादक आहे.
उत्पादनांचा संग्रह:
कंपनी प्रामुख्याने खनिज प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर प्रक्रिया करण्यासाठी उत्पादने आणि उपायांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. कंपनी त्यांच्या ग्राहकांद्वारे खाणकाम आणि खनिज प्रक्रिया, स्क्रीनिंग, ग्राइंडिंग आणि मटेरियल हाताळणीच्या विविध टप्प्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रबर, पॉलियुरेथेन, स्टील आणि सिरॅमिक-आधारित अस्तर घटकांचा विस्तृत उत्पादन संग्रह प्रस्तुत करते. कंपनीच्या उत्पादन संग्रहामध्ये ५५ हून अधिक खनिज प्रक्रिया आणि साहित्य हाताळणी उत्पादनांचा समावेश आहे. तेगा इंडस्ट्रीजचे सहा उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी तीन भारतात (गुजरातमधील दहेज आणि पश्चिम बंगालमधील समली आणि कल्याणी), आणि उर्वरित तीन चिली, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खाण केंद्रांमध्ये आहेत. तेगा इंडस्ट्रीजची उत्पादने ७० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रचलित असून तिचा ९० टक्के महसूल भारताबाहेरचा आहे.
हेही वाचा >>> बाजारातील माणसं : शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष भगीरथ मर्चंट
कंपनीच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा प्रमुख कच्चा माल हा रबर संयुग (कंपाऊंड) आहे, जे भारतात कार्बन ब्लॅक, उच्च दर्जाचे नैसर्गिक रबर, पॉलियुरेथेन रबर आणि स्टायरीन-बुटाडियन रबर यासारख्या प्राथमिक कच्च्या मालापासून तयार होते. कंपनी तिच्या विविध सुविधांवर उत्पादित केलेल्या उत्पादनांमध्ये दर्जेदार सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी तिच्या उपकंपन्या, तेगा चिली आणि तेगा आफ्रिका यांना मध्यवर्ती कच्चा माल म्हणून त्यांनी उत्पादित केलेले रबर संयुगे निर्यात करते. कंपनी आपली उत्पादने थेट विक्री करते. कंपनीचे १८ जागतिक आणि १४ देशांतर्गत विक्री कार्यालयांचे अंतर्गत विक्री आणि वितरण नेटवर्क आहे.
डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत १५ टक्के वाढ साध्य करून ती २९७ कोटीवर नेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल ४४ टक्के वाढ होऊन तो ४८.३७ कोटीवर गेला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने ४५३ रुपये प्रति शेअर दराने ‘आयपीओ’द्वारे बाजारात पदार्पण केले होते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सध्या ६८० रुपयाच्या आसपास असलेला हा शेअर प्रत्येक मंदीत खरेदी करण्यासारखा आहे. हा शेअर दोन वर्षांत ४० टक्के परतावा देऊ शकेल.
हेही वाचा >>> कच्छच्या रणातील बहुमूल्य माणिक – आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
तेगा इंडस्ट्रीज लिमिटेड
(बीएसई कोड ५४३४१३)
प्रवर्तक: मदन मोहन मोहंका
बाजारभाव: रु. ६८४ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: मिनरल प्रोसेसिंग
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६६.२९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७९.१७
परदेशी गुंतवणूकदार २.४६
बँक/ म्यु. फंड/ सरकार ११.६७
इतर/ जनता ६.७०
पुस्तकी मूल्य: रु.११६
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: — %
प्रति समभाग उत्पन्न: रु. २३.४८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९.१
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.३०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १०.१
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड: १९
बीटा : ०.७
बाजार भांडवल: रु. ४,५३४ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६७०/ ४०२
stocksandwealth@gmail.com