देशांतर्गत भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन ३.३१ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे. परिणामी भारतीय भांडवली बाजाराने जागतिक पातळीवर सर्वाधिक मूल्य असलेल्या बाजारांमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. विद्यमान वर्षात जानेवारीमध्ये फ्रान्सच्या भांडवली बाजाराने पाचवे स्थान भारतीय भांडवली बाजाराकडून बळकावले होते. मात्र देशांतर्गत आघाडीवर मार्च महिन्यात तेजीवाल्यांनी पुन्हा एकदा बाजाराचा ताबा घेतला.
भारतीय अर्थव्यवस्थेची समाधानकारक वाटचाल आणि परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने २८ मार्चपासून देशांतर्गत भांडवली बाजार तेजीत आहेत. तेव्हापासून बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे १० टक्क्यांनी वधारले आहेत तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप जवळपास १५ टक्क्यांनी वधारले आहेत. बीएसई बँकेक्समध्ये १३ टक्क्यांची भर पडली. मागील दोन महिन्यांत परकीय गुंतवणूकदारांनी ६.३ अब्ज डॉलरचे समभाग खरेदी केले आहेत.
भारतातील भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्यांकन ३.३१ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे. सर्वाधिक मूल्याचे भांडवली बाजार असलेल्या आघाडीच्या दहा देशांमध्ये भारताचे स्थान आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतातील भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या मूल्यांकनात सुमारे ३३० अब्ज डॉलरची भर पडली आहे.
अमेरिकेचा बाजार पहिल्या स्थानी
सध्या अमेरिकी भांडवली बाजार ४४.५४ लाख कोटी डॉलर बाजारमूल्यासह पहिल्या स्थानी कायम आहे, त्यानंतर चीन १०.२६ लाख कोटी डॉलरसह दुसऱ्या स्थानी आणि जपान ५.६८ लाख कोटी डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ हाँगकाँग ५.१५ लाख कोटी डॉलर बाजार भांडवलासह चौथ्या क्रमांकावर आहे, तर फ्रान्स ३.२४ लाख कोटी डॉलर बाजार मूल्यासह सहाव्या स्थानावर घसरला आहे.
हेही वाचाः विश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार