लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भांडवली बाजारातील तेजीची विक्रमी दौड अखंडपणे सुरू असून प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ऐतिहासिक ७९,००० अंशांचा टप्पा ओलांडला, तर निफ्टीने गुरुवारी पहिल्यांदाच ऐतिहासिक २४,००० अंशांची उच्चांकी पातळी गाठली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स आणि टीसीएसच्या समभागांनी सलग चौथ्या दिवशी चमकदार कामगिरी दाखवत निर्देशांकांना नव्या उंचीवर पोहोचवले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५६८.९३ अंशांनी वधारून ७९,२४३.१८ या नव्या शिखरावर स्थिरावला. गुरुवारच्या व्यवहारात त्याने ७२१.७८ अंशांची कमाई करत ७९,३९६.०३ या नवीन सार्वकालिक शिखराला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १७५.७० अंशांची भर घातली आणि तो दिवसअखेर २४,०४४.५० या नव्या विक्रमी उच्चांकावर विसावला.
हेही वाचा >>>मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘ईव्ही’केंद्रित एक्सचेंज ट्रेडेड फंड दाखल
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी अल्ट्राटेक सिमेंट ५ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग त्यांच्या ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीवर स्थिरावले. एनटीपीसी, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्र बँक आणि टेक महिंद्र या कंपन्यांच्या समभागांमध्ये देखील मोठी वाढ झाली. दुसरीकडे लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, नेस्ले, एचडीएफसी बँक आणि मारुतीच्या समभागात मात्र घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी ३,५३५.४३ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले.
व्होडा-आयडिया समभाग ५ वर्षांच्या उच्चांकी
दूरसंचार क्षेत्रातील कर्जजर्जर व्होडा-आयडियाच्या समभागाने गेल्या काही महिन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुरुवारच्या सत्रात समभाग २.७७ टक्क्यांनी वधारून १८.५२ रुपयांवर स्थिरावला. समभागाने १८.७० ही गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी पातळीला यादरम्यान गवसणी घातली. याआधी २९ मार्च २०१९ रोजी समभागाने ही पातळी दाखवली होती. जून महिन्यात आतापर्यंत व्होडाफोन आयडियाचा समभाग २१ टक्क्यांनी वधारला आहे. एप्रिलमध्ये कंपनीने एफपीओच्या माध्यमातून १८,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीनंतर तो ६८ टक्क्यांनी वधारला आहे.
सेन्सेक्स ७९,२४३.१८ ५६८.९३ ( ०.७२%)
निफ्टी २४,०४४.५० १७५.७० ( ०.७४%)
डॉलर ८३.४४ – १३
तेल ८५.९७ ०.८४