मार्चमध्ये १६,८०० वर रेंगाळणारी, नाकावर सूत असलेली निफ्टीची अवस्था होती. या स्तरावर निफ्टीची व तेजीची नजरानजर होऊन, निफ्टी निर्देशांकाच्या शिडात तेजीचं वारं भरलं आणि निफ्टी निर्देशांकाने २०,००० चा मैलाचा दगड साध्य केला. सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धातील आसमंत तेजीच्या उल्हसित वातावरणाने भारलेला असताना, त्यावेळच्या तेजीची वाटचाल काव्यात्मक स्वरुपात मांडायची झाल्यास कवी निदा फाज़ली यांच्या गजलेतील ‘उनसे नज़रें क्या मिलीं रोशन फिजाएं हो गई’ या ओळी त्या तेजीच्या वातावरणाला अगदी चपखल बसतात. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स:- ६६,००९.१५

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

निफ्टी:- १९,६७४.२५

गेल्या लेखातील १,००० अंशांच्या तेजीच्या गृहीतकातील वाक्य होतं – “आताच्या घडीला निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,८०० चा स्तर राखत असल्याने निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २०,००० ते २०,१०० असेल. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य अनुक्रमे १९,८०० ते १९,५०० असेल.”

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो : वंचित बाजारपेठेसाठी सेवा-बंध

गेल्या लेखातील या वाक्यांनी भविष्यातील घसरणीची मानसिक तयारी करून घेतल्यामुळे ही घसरणदेखील सुखावह वाटत आहे. या घसरणीतदेखील सप्टेंबरच्या पूर्वार्धातील २०,००० चे उल्हसित दिवस मनात रुंजी घालत असतात. यातील दुग्धशर्करा योग म्हणजे २०,०००च्या ऐतिहासिक उच्चांकावर अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनी ‘शिंपल्यातील मोती’ सदरातील ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चा समभाग ४३९.३० रुपयांवरून १,४३८ रुपये, डीसीडब्ल्यू समभाग ५२ रुपयांवरून ६३ रुपये, सेंट्रल बँकेचा समभाग ३३ रुपयांवरून ५५ रुपये, दिलीप बिल्डकॉनचा समभाग २३३ रुपयांवरून ३४० रुपये, पीसीबीएलचा समभाग १३३ रुपयांवरून १७९ रुपये, गोदरेज इंडस्ट्रीजचा समभाग ४२४ रुपयांवरून ६०० रुपये झाल्याचेही अनुभवले. या समभागांनी आपली प्रथम अथवा दीर्घमुदतीची वरची लक्ष्यं साध्य करत किमान २० व कमाल २२० टक्के परतावा दिला. त्यामुळे अल्पमुदतीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या समभागांची नफारूपी विक्री हीदेखील ऐतिहासिक उच्चांकावर केली. उच्चांकावर समभागांची नफारूपी विक्री करून, दोन पैसे गाठीला बांधल्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली, या भावनेचे सुख काही औरच असते! ‘शिंपल्यातील मोती’ सदरातील सुचविलेल्या समभागांवर तेजीची नजर पडल्यावर…‘उनसे नज़रें क्या मिलीं रोशन फिजाएं हो गई’ झाले आहे.

येणाऱ्या दिवसातील निफ्टी निर्देशांकांवरील सुधारणेत १९,९०० ते २०,१५० हा अवघड टप्पा असून, निफ्टी निर्देशांक सातत्याने २०,१५० स्तरावर दहा दिवस टिकल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २०,४०० ते २०,७०० असेल. निफ्टी निर्देशांक सातत्याने २०,१५० स्तरावर दहा दिवस टिकण्यास अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १९,६०० ते १९,३०० असेल.

दीर्घमुदतीच्या तेजीचे गृहीतक भाग-५

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकावर २०,५०० च्या वरच्या लक्ष्याचा मागोवा घेण्यासाठी निफ्टी निर्देशांकावरील १ डिसेंबर २०२२ चा उच्चांक १८,८८७ आणि १७ जून २०२२ चा नीचांक १५,१८३ लक्षात घ्यावा लागेल. हे उच्चांक आणि नीचांक घेऊन, ‘इनव्हर्स हेड अँण्ड शोल्डर’ प्रमेयाचा आधार घेता येईल. सर्वप्रथम निर्देशांकावरील १ डिसेंबर २०२२ चा उच्चांक १८,८८७ उच्चांक आणि १७ जून २०२२ चा नीचांक १५,१८३ या दोहोंतील फरक हा ३,७०४ येतो. आता उच्चांक-नीचांकामधील मध्यबिंदू काढण्यासाठी ३,७०४ अंशांचे अर्धे १,८५२ अंश येतात. आता १,८५२ अंश हे १७ जून २०२२ च्या १५,१८३ या नीचांकात मिळवले असता १७,०३५ हा मध्यबिंदू येतो. आता निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काढण्यासाठी १७,०३५ अंशांच्या मध्यबिंदूत ३,७०४ हा उच्चांक-नीचांकातील फरक मिळवला असता निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २०,७३९ येते. जो निफ्टीच्या ३०० अंशांच्या परिघामध्ये तंतोतंत बसतो, जसे की १९,८०० ३०० अंश २०,१००… २०,४००… २०,७०० असा क्रम असेल.

शिंपल्यातील मोती

कोकुयो कॅम्लिन लिमिटेड

(शुक्रवार, २२ सप्टेंबर भाव – १३६.६५ रु.)

शिक्षणाच्या ‘श्रीगणेशा’पासून मोठमोठ्या प्रकल्पांचे आलेखन हे हातात पेन्सिल घेऊन कागदावरच होते. यात शालेय जीवनातील भूमितीसाठीची स्कॉलर कम्पास पेटी, गोंद, अधोरेखित करण्यासाठी हायलायटर, व्हाइट बोर्ड मार्कर, शाई, कार्बन पपेर, स्टॅम्प पॅड अशा आबालवृद्धांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे उत्पादन करणारी ‘कोकुयो कॅम्लिन लिमिटेड’ या कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

दोन आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेता कंपनीची विक्री १९५.९५ कोटींवरून २३५.२६ करपूर्व नफा ८.३५ कोटींवरून २३.७९ कोटींवर, तर निव्वळ नफा दुपटीहून अधिक असा ८.३५ कोटींवरून १८.३७ कोटींवर झेपावला अशी उत्तम कामगिरी कंपनी करत आहे.

हेही वाचा – बाजार रंग: सत्तावीस वजा सातचे कोडे !

‘कोकुयो कॅम्लिन लिमिटेड’ समभागाचे आलेख वाचन करता अवघ्या चार महिन्यांत हा समभाग ६७ रुपयांवरून १६५ रुपयांवर, अतिजलद अशा ‘भूमिती श्रेणीत’ वाढल्याने, थोडी घसरण ही १२५ ते ११५ रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. या घसरणीत समभाग खरेदी केल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य २०० रुपये असेल. या समभागाचे दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य २५० ते ३०० रुपये असेल. हा समभाग १२५ ते ११५ रुपयांदरम्यान खरेदी केल्यास, या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ९० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.

महत्त्वाची सूचना : – या समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

निकालपूर्व विश्लेषण

१) एचडीएफसी एएमसी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, १२ ऑक्टोबर

२२ सप्टेंबरचा बंद भाव – २,६५६.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,७५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२५० रुपयांपर्यंत घसरण.

२) इन्फोसिस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार,१२ ऑक्टोबर

२२ सप्टेंबरचा बंद भाव- १,४९६.१५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,४२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,४२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७२० रुपये.

ब) निराशादायक निकाल: १,४२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३५० रुपयांपर्यंत घसरण.

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader