मुंबई : लार्सन ॲण्ड टुब्रो, इन्फोसिस आणि महिंद्र ॲण्ड महिंद्र या सारख्या अग्रणी समभागांनी साधलेल्या मूल्यवाढीतून आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांपायी भांडवली बाजारात निर्देशांकांची आगेकूच शुक्रवारी सलग चौथ्या सत्रापर्यंत विस्तारली. परिणामी निफ्टी निर्देशांकाने २२ हजारांच्या शिखर पातळीलाही पुन्हा गाठले. दोन्ही निर्देशांकांनी चालू महिन्यांतील सर्वोच्च साप्ताहिक बंद पातळीही नोंदवली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहअखेरच्या व्यवहारात ७२,४२६.६४ वर बंद झाला. त्याने ३७६.२६ अंशांची (०.५२ टक्के) नव्याने कमाई करत भर घातली. सत्रांतर्गत व्यवहारादरम्यान या निर्देशांकाने ७२,५४५.३३ असा उच्चांक आणि ७२,२१८.१० अशा निम्न पातळीदरम्यान हेलकावे दर्शविले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १२९.९५ अंशांनी (०.५९ टक्के) वाढून २२,०४०.७० या पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> Money Mantra : दिवस तुझे हे फुलायचे…
गुंतवणूकदारांचा होरा आता अधिकाधिक लार्ज-कॅप समभागांकडे वळला असल्यामुळे सेन्सेक्स-निफ्टीला त्यातून बळ मिळत आहे. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स निर्धारीत करणाऱ्या समभागांमध्ये विप्रो सर्वाधिक ४.७९ टक्क्यांनी वाढला, त्यानंतर महिंद्र ॲण्ड महिंद्र, लार्सन ॲण्ड टुब्रो, टाटा मोटर्स, मारुती, इन्फोसिस, नेस्ले इंडिया आणि इंडसइंड बँक यांनी सरशी साधली. महिंद्रचा समभाग ३.९६ टक्क्यांनी वाढून १,८३५.५५ रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला. त्यांनी जर्मन वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगन समूहासोबत विद्युत वाहनांच्या सुट्या घटकांसाठी पुरवठा करार जाहीर केल्यानंतर समभागांना मागणी वाढली. पॉवरग्रीड, एसबीआय, रिलायन्स, एनटीपीसी आणि ॲक्सिस बँक हे सेन्सेक्समधील पिछाडीवर राहिलेले समभाग होते.
बाजारात शुक्रवारी सर्वव्यापी समभाग खरेदी झाली. परिणामी मधल्या आणि तळच्या फळीतील समभागांचे प्रतिनिधित्व करणारे, बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक देखील अनुक्रमे ०.६८ टक्के आणि ०.७८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.