मुंबई: अमेरिकेतील रोजगारासंबंधी महत्त्वपूर्ण आकडेवारीच्या घोषणेपूर्वी जगभरातील बाजारावर दिसून आलेला ताण, तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने सुरू असलेली विक्री आणि देशांतर्गत आर्थिक वाढीतील कमकुवतपणा या घटकांच्या परिणामी शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजाराला पडझडीने घेरले. निवडक माहिती-तंत्रज्ञान (आयटी) समभाग वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक आणि समभागांमध्ये घसरणीची लाट दिसून आली.
खनिज तेलाच्या तापलेल्या आंतरराष्ट्रीय किमती आणि मजबूत डॉलरपुढे ८६ खाली शरणागत झालेल्या रुपयामुळे बाजारावरील नकारात्मक छायेला गडद बनविले. परिणामी, अत्यंत अस्थिर सत्रात सेन्सेक्स २४१.३० अंशांच्या (०.३१ टक्के) नुकसानीसह, ७७,३७८.९१ वर दिवसअखेर स्थिरावला. सत्राअंतर्गत हा निर्देशांक ८२० अंशानी गडगडून, ७७,०९९.५५ असा तळ त्याने दाखविला. तेथून तो उसळला असला, तरी त्याला सकारात्मक वाढीचे वळण घेणे मात्र शक्य झाले नाही. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर २३,४३१.५० वर स्थिरावला आणि त्यात ९५ अंशांची (०.४० टक्के) घसरण झाली. गत तीन सत्रांतील घसरणीने दोन निर्देशांकांचे एकत्रित २.३२ टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे. सेन्सेक्सने १,८४४.२ अंश, तर निफ्टीने ५७३.२५ अंश गमावले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा