Top 10 Indian Investors Lost 81,000 Crore In Market Fall: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सतत घसरण सुरू आहे. यामध्ये लहान गुंतवणूकदारांचे करोडोंचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे. इतकेच, नव्हे तर देशातील काही प्रसिद्ध वैयक्तिक गुंतवणूकदारांनाही याचा मोठा फटका बसला आहे. या बड्या गुंतवणूकदारांपैकी अव्वल १० गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओचे मूल्य १ ऑक्टोबर २०२४ पासून सुमारे ३०% म्हणजेच ८१,००० कोटींनी कमी झाले आहे.

१ ऑक्टोबरपासून निफ्टी ५० निर्देशांक ११% घसरला आहे, तर निफ्टी मिडकॅप १५० आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १७% आणि २२% घसरले आहेत. या घसरणीमागे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय इक्विटीजची विक्री हे प्रमुख कारण आहे. दुसरीकडे अनेक स्मॉलकॅप आणि पेनी स्टॉक ३०% ते ८०% दरम्यान घसरले आहेत, याचाही फटका गुंतवणूकदारांना बसल्याचे दिसत आहे. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

दमानी, झुनझुनवालांना किती फटका?

प्राइमइन्फोबेस.कॉमच्या आकडेवारीनुसार, डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या होल्डिंग्जचे मूल्य १ ऑक्टोबरपासून ६४,००० कोटी रुपये किंवा २८% ने कमी झाले आहे. तर, दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाच्या पोर्टफोलिओमध्ये १ ऑक्टोबरपासून १९% घट झाली आहे. आकाश भंशाली यांच्या पोर्टफोलिओमध्ये ऑक्टोबरपासून १६% घट झाली आहे. यामध्ये गुजरात फ्लोरोकेमिकल्समध्ये सर्वाधिक १३% घट आहे. मात्र, त्यांची दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक, वन ९७ कम्युनिकेशन्स (पेटीएमची पालक कंपनी) या कालावधीत ५% वाढली आहे.

भारतीय शेअर बाजारातील मंदीच्या काळात माजी इन्व्हेस्टमेंट बँकर हेमेंद्र कोठारी यांच्या सूचीबद्ध कंपन्यांमधील संपत्तीत २९% घट झाली आहे. १ ऑक्टोबरपासून त्यांच्या दोन टॉप होल्डिंग्ज असलेल्या अल्काइल अमाइनेस केमिकल्स आणि सोनाटा सॉफ्टवेअर अनुक्रमे २८% आणि ३३% घसरल्या आहेत.

काही मोठे गुंतवणूकदार सावरले

शेअर बाजारातील या नकारात्मक वातावरणात मुकुल अग्रवाल, आशिष कचोलिया आणि युसुफअली कादर सारख्या काही गुंतवणूकदारांनी त्यांचे नुकसान मर्यादित ठेवण्यात यश मिळवले आहे. १ ऑक्टोबरपासून बीएसईच्या शेअर्समध्ये ४०% वाढ होऊनही परम कॅपिटलच्या मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये ६% घट झाली. या काळात त्यांचे इतर दोन टॉप होल्डिंग्ज न्यूलँड लॅबोरेटरीज आणि रॅडिको खेतान स्थिर राहिले आहेत.

Story img Loader