श्रीकांत कुवळेकर

सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने कमोडिटी मार्केटच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचे असतात. विशेषत: कृषी कमोडिटीसाठी तरी. कारण भारतात खरिपाची काढणी सुरू झालेली असते. तर जगाच्या उत्तर गोलार्धामधील महत्त्वाच्या कमोडिटी, यामध्ये प्रामुख्याने गहू, सोयाबीन आणि नंतर कापूस, जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात होते. त्याचा परिणाम येथील बाजारांवरदेखील जाणवतो. अशा वातावरणातच देश-विदेशात कमोडिटी बाजाराशी संबंधित स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या जातात. यामध्ये देशोदेशीचे व्यापारी, आयात-निर्यातदार, सरकारी पाहुणे यांची मोठी लगबग असते. अनुपस्थिती असते ती केवळ उत्पादकांची किंवा मोठ्या प्रमाणावर असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांची.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ

हे सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की, भारतात, म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतदेखील मागील आठवड्यात निदान चार आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. यामध्ये तेलबिया, पामतेल आणि इतर खाद्यतेले, तसेच साखर या क्षेत्रातील साडेतीन हजारांहून अधिक लोकांचा सहभाग होता. तशा या परिषदा दरवर्षी ग्लोबॉईल या ब्रॅंडखाली होतच असतात. परंतु यावर्षी यामध्ये आणखी एका कमोडिटीची भर पडली ती म्हणजे हळद. ग्लोबॉईलचे एक संयोजक टेफलाज यांनी कृषी-कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्स यांनी संयुक्तपणे ‘आंतरराष्ट्रीय हळद परिषद’ भरवली. राज्याच्या आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हळदीसाठी असलेली पाहिलीवहिली परिषद ही अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली आहे. ती का याची कारणे पुढे दिली आहेतच. इतर राज्यात तेथील छोट्या-छोट्या पिकांनादेखील ग्लॅमर मिळवून देण्यात तेथील व्यापारी-राज्य सरकारे तत्पर असतात. गवार, वेलची, मेंथा ऑइल ही काही ठळक उदाहरणे. त्यामानाने जगातील साठाहून अधिक देशात निर्यात होणाऱ्या हळदीला कमोडिटी म्हणून तुलनेने कमीच महत्त्व दिले जात होते. परंतु ही परिषद या परिस्थितीत नक्कीच बदल घडवेल इतपत ती यशस्वी झाली म्हणून त्याचा सविस्तर वृत्तान्त.

आणखी वाचा-विस्मृतीतील हिरा : चिंतामण द्वारकानाथ देशमुख

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परिषदेत केवळ व्यापाऱ्यांचाच सहभाग नव्हता, तर उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात हळद उत्पादक राज्यांमधील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था आणि स्थानिक व्यापारी यांचा भरणा अधिक होता. जो या प्रकारच्या इतर परिषदांमध्ये वर म्हटल्याप्रमाणे अभावानेच आढळून येतो. तसेच देशाचे फलोत्पादन आयुक्त, कृषी विद्यापीठाचे प्राचार्य, नाबार्ड आणि अनेक कृषी-पूरक संस्था, मसाला कंपन्या आणि वायदे बाजारतज्ज्ञ उपस्थित होते. परंतु यामध्ये विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे एरवी उद्घाटनाचे भाषण ठोकून निघून जाण्याऐवजी हळद या कमोडिटीवर प्रेम असलेला आणि हळदीला ग्लॅमर मिळवून देण्याचा चंग बांधलेला एक राजकीय नेता चक्क उद्घाटनापासून ते परिषद संपेपर्यंत केवळ उपस्थितच नव्हे तर प्रत्येक चर्चासत्र नीट लक्ष देऊन ऐकण्याबरोबरच या क्षेत्रातील वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करण्यात सतत रस दाखवत होता. महाराष्ट्रात हळद रिसर्च सेंटर स्थापन करण्यात मोलाचा सहभाग असलेले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हा तो नेता.

या परिषदेत कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्स आणि हळद रिसर्च केंद्र – हरिद्रा यांच्यामध्ये एक सामंजस्य करारदेखील करण्यात आला असून, यातून येत्या वर्षांमध्ये राज्यातील हळद व्यापार वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी मार्केटबाबतची माहिती आणि किंमत जोखीम व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सुलभ कशी करता येईल याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल. सध्या हळद वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत असला तरी ऑप्शन व्यापार वाढवून शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि किंमत जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी संयुक्त प्रयत्न केले जाणार आहेत. अर्थात सुरुवातीला यासाठी राज्य सरकार, सरकारी आणि बिगर सरकारी संस्था व नियंत्रक सेबी यांचा सहभाग आणि आर्थिक सहकार्य महत्त्वाचे आहे याबाबत सर्वच उपस्थितांनी एकमत व्यक्त केले.

आणखी वाचा-बाजारातील माणसे : चार्ली मुंगेर आणि वॉरेन बफे

एकंदरीत आजवरच्या कृषी कमोडिटी परिषदांपेक्षा सर्वार्थाने वेगळ्या ठरलेल्या या परिषदेचे महत्त्वाचे फलित म्हणजे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थितीच नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग. यामध्ये अनेक शेतकरी प्रत्यक्ष बांधावरील आणि बाजार समितीतील साठवणूक, मूल्यवर्धन आणि विक्री समस्या तसेच काढणी-पूर्व तंत्रज्ञान, बियाणे निवड, शास्त्रीय शेती-व्यवधाने इत्यादी बाबतचे प्रश्न हिरिरीने मांडत होते, एखादे भाषण-चर्चा महत्त्वाची वाटली तर ती अधिक लांबवण्यासाठी आयोजकांवर दबाव आणत होता. खऱ्या-खुऱ्या अर्थाने ‘इनक्लुझिव्ह’ ठरलेल्या या परिषदेत उणीव भासली ती मुख्य माध्यमांनी फिरवलेली पाठ. राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या आणि अनेक कमोडिटी परिषदांऐवजी टीव्ही वृत्तवाहिन्या नेत्यांची चिखलफेक आणि गणेशोत्सव मंडळांच्या भेटी दाखवण्यात मग्न होते याहून राज्याचे दुर्दैव ते काय?
हळद व्यापार अंदाज

यापूर्वी आपण या स्तंभातून हळद बाजारातील हालचालींचा अनेकदा वेध घेतला आहेच. दुष्काळामुळे हळद बाजारात काय होऊ शकेल याबाबत माहिती देताना, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उशिरा पाऊस झाल्यास त्यात बदल होऊ शकेल असेही म्हटले होते. झालेही तसेच आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक भागांत चांगला पाऊस झाला आहे. अर्थात हळद पिकाला त्यामुळे नक्की फायदा होणार असला तरी पूर्ण ऑगस्ट कोरडा गेल्यामुळे सुरुवातीला अनुमानित ३०-३५ टक्क्यांची उत्पादन घट नक्की किती भरून निघेल, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली गेली आहे. एकंदर गोषवारा असे दर्शवतो की, मार्च-एप्रिलपर्यंत वातावरण सर्वसाधारण राहिले तर ही घट १५ टक्क्यापर्यंत खाली येऊ शकेल. तर हळदीचे क्षेत्र ११ टक्के घटले असून उत्पादन १०.३ लाख टन, म्हणजे मागील वर्षापेक्षा सुमारे १२ टक्के कमी राहील, असे हैदराबाद-स्थित ट्रान्सग्राफ कन्सल्टिंग या नामांकित संस्थेने म्हटले आहे. त्याचवेळी दक्षिण भारतात अति-पाऊस होण्याच्या शक्यतेने उत्पादकतेत घट येण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा-बाजारातील माणसं – ‘हमारा बजाज’ राहुल बजाज

हळदीच्या किमतीबाबतचे अंदाज मात्र टोकाचे आहेत. टेक्निकल चार्टतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यात तिप्पट होऊन १८ हजार रुपये क्विंटलवर गेल्यावर हळद बाजार महिनाभर ११,५०० – १४,८०० या कक्षेत बाजारातील विविध प्रकारच्या माहितीचा कानोसा घेत राहील. मात्र त्यानंतर परत तेजी येऊन बाजार सुरुवातीला २०,००० रुपये आणि नंतर अगदी २३,००० रुपयांवर जाण्याची एक शक्यतादेखील केडिया सिक्युरिटीज आणि इंटेलीकॅपचे दिनेश सोमाणी यांनी व्यक्त केली आहे. अर्थात हे अंदाज एक विशिष्ट परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून केलेले असतात. पुरवठ्यातील जास्तीत जास्त घट किती आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मागणीबाबत म्हणायचे तर हळद स्वस्त झाली म्हणून आपण नेहमीपेक्षा दुप्पट प्रमाणात वापरत नाही किंवा महाग झाली म्हणून वापर कमीदेखील करीत नाही. ही फुटपट्टी वापरली तर मागणीत नक्की किती वाढ होऊ शकेल याबाबत आपणही अंदाज लावू शकतो.

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक / ksrikant10@gmail.com)

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

Story img Loader