डॉ. आशीष थत्ते
गेल्या काही लेखातून अर्थसंकल्प आणि अर्थमंत्र्यांची माहिती वाचून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, अर्थसंकल्प सादर होईपर्यंत थोडी त्याविषयी माहिती आपण घेणार आहोत.
अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्रालयातील अधिकारी जवळपास महिनाभर त्याची तयारी करतात. भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याचा शुभारंभ तोंड गोड करून करण्यात येतो. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये ‘हलवा समारंभ’ आयोजित करून मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यांनतर अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती. गेल्यावर्षीपासून (२०२१) करोना महामारीमुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प छापला गेला नसून त्याला डिजिटल स्वरूप देण्यात आले.
क.. कमॉडिटीचा : अर्थसंकल्प अन् शेती सामर्थ्यांच्या निमित्ताने!
भारत सरकारकडून हलवा खाण्याचा समारंभ दरवर्षी अर्थसंकल्पाच्या आधी आयोजित केला जातो. अर्थात हा काही गाजराचा हलवा नसून उत्तरेत बनवला जाणारा म्हणजे आपल्याकडे ज्याला आपण शिरा म्हणतो. अन्यथा मागील अर्थसंकल्पातील दाखवलेली गाजरे शेवटी यावर्षी हलवा म्हणून वाटून टाकली असे म्हणायला वाव असावा. १९५० मध्ये अर्थसंकल्प सादर करताना, त्यातील काही गोष्टी आधीच जाहीर झाल्याचे लक्षात आल्यानंतर अर्थमंत्रालयाने बाहेरून अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम बंद केले आणि स्वतःच छापखाना अर्थमंत्रालयातच सुरू केला. आता छापखान्यात काम करणारे कर्मचारी होते ते अर्थातच रात्री आपल्या घरी जाणार आणि त्यामुळे पुन्हा अर्थसंकल्पाच्या तरतुदी फुटतील, असा नवीन प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना छपाईचे काम सुरू झाल्यापासून अर्थमंत्रालयातच म्हणजे ‘नॉर्थ ब्लॉक’ मध्ये राहायची सोय केली आणि ज्या दिवशी छपाईचे काम सुरू होईल, त्या दिवशी सर्व कर्मचारी हलवा बनवू लागले आणि अर्थमंत्रीदेखील त्यात सामील होत असतात. इतकी वर्षे हे अव्याहतपणे सुरू होते. मात्र २०२१ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘पेपरलेस’ अर्थात डिजिटल अर्थसंकल्प सादर केला. कारण करोनाच्या वाढत्या साथीमुळे तो निर्णय घ्यावा लागला. पण तेव्हापासून बहुतेक हेच चालू राहील असे वाटते. या वर्षीदेखील हरित अर्थसंकल्प सादर केला जाईल. मात्र त्यामुळे हलवा बनवण्याचा आणि खाण्याचा समारंभ बंद झालेला नाही. हा पारंपरिक समारंभ चालू वर्षात २६ जानेवारीला पार पडला. अर्थसंकल्प बनवण्याचे काम ऑक्टोबरपासूनच सुरू होते. त्यात अर्थमंत्रालयातील कर्मचारी अथक मेहनत घेतात. त्यांच्या मेहनतीचे चीज आणि कृतज्ञता म्हणून स्वतः अर्थमंत्री कर्मचाऱ्यांना आपल्या हाताने हलवा देतात.
कित्येक वर्ष प्रत्येक अर्थमंत्री एक ‘ब्रिफकेस’ मधून आपल्या अर्थसंकल्पाच्या प्रति घेऊन जाताना संसदेच्या बाहेर छायाचित्रकारांना अभिवादन करताना आपण बघितले असेल. निर्मला सीतारामन यांनी या परंपरेला छेद दिला. २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अर्थसंकल्प एका लाल कपड्यात गुंडाळून आणला होता, त्याला बही-खाता असे म्हटले जाते. ब्रिफकेस किंवा सुटकेस मला आवडत नाही म्हणून मी माझ्या मामीने लाल कपड्याचे दप्तर बनवून दिले. जे अगदीच घरचे वाटू नये म्हणून मी त्यावर अशोक स्तंभाचे चिन्ह लावले, असे सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले. बदल हा नेहमीच होत असतो आणि तोच कायम असतो. पुढे या प्रथांमध्ये काळानुरूप बदल घडत जातील, पण तरीही परंपरा कायम राहतील असे वाटते. आता प्रतीक्षा १ फेब्रुवारीची, बघू यंदा किती प्रथांना छेद दिला जातो.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत /
ashishpthatte@gmail.com
@AshishThatte