केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. त्या सभागृहात आल्या, त्यांनी अर्थसंकल्प वाचला आणि त्या जिंकल्यासुद्धा. देशाच्या इतिहासात कित्येक अर्थसंकल्प सादर झाले, पण प्रत्येक अर्थसंकल्पात काही तरी वेगळेपण किंवा रंजक गोष्टी घडतात. यावेळी फार काही घडले नाही. मात्र चुकून ”जुन्या प्रदूषित” वाहनांच्या ऐवजी ”जुन्या राजकारणी” असे म्हटल्यावर अर्थमंत्र्यांना चूक लक्षात आली आणि सभागृहात एकच हशा पिकला. नंतर सीतारामन यांनी तसा काही फरक नाही असेसुद्धा म्हटले. या अर्थसंकल्पाला सीतारामन यांच्या साडीची बरीच चर्चा झाली. कित्येक कारागीर महिलांनी मेहनत घेऊन बनवलेली कसुती क्राफ्टची साडी अर्थमंत्र्यांनी नेसली होती. अर्थसंकल्पाच्या काही महिने आधी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी कारागिरांना प्रोत्साहन म्हणून सीतारामन यांना ही साडी नेसण्याची विनंती केली होती. देशातील महिला नवीन साडी घेण्यापूर्वी याचा आता नक्की विचार करतील.
निर्मला सीतारामन यांच्या आधी इंदिरा गांधी या अर्थसंकल्प मांडणाऱ्या भारतातील पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या. त्यांन १९७० मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थात महिलांमध्ये सीतारामन यांचा क्रमांक नक्कीच वरचा आहे. मात्र, मोरारजी देसाई (१० वेळा), चिदंबरम (९ वेळा), प्रणब मुखर्जी (८ वेळा) यशवंत सिन्हा (८ वेळा) यांचा विक्रम मोडण्यासाठी अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. तरीदेखील देशाच्या इतिहासात सलग ५ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे जे अर्थमंत्री आहेत त्यांच्यामध्ये सीतारामन यांचे नाव आता जोडले गेले आहे.
हेही वाचा – उदयमान ‘एसएमई बँकिंग’मधील अग्रणी
मोरारजी देसाई, मनमोहन सिंग, अरुण जेटली, चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांच्या पंक्तीत आता निर्मला सीतारामन यांचे नाव समाविष्ट झाले आहे. सीतारामन यांनी इंग्रजीमध्ये अर्थसंकल्प सादर केला. पण अर्थसंकल्प हिंदी भाषेतदेखील तयार केला जातो आणि ही प्रथा १९५५ मध्ये सुरू झाली. संसदेतील काही सदस्य कानाला हेडफोन लावून बसले होते, त्यात अगदी माननीय पंतप्रधानदेखील होते. म्हणजे ज्यांना हिंदी भाषेत अर्थसंकल्प ऐकण्याची इच्छा असेल, त्यांना तीदेखील सोय उपलब्ध आहे. त्यावेळेचे अर्थसंकल्पीय भाषण लहान होते. ते सुमारे १ तास आणि २५ मिनिटे चालले. मात्र, निर्मला सीतारामन यांच्या नावावर सर्वात जास्त वेळ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. २०२१ चे अर्थसंकल्पीय भाषण २ तास ४० मिनिटे चालले, तर २०२० चे भाषण २ तास आणि १७ मिनिटे चालले होते. आतापर्यंत जवाहरलाल नेहरू (१९५८), इंदिरा गांधी (१९७०) आणि राजीव गांधी (१९८७) या पंतप्रधान पदावरील व्यक्तींनी अर्थसंकल्प सादर केला होता.
हेही वाचा – बाजारातील माणसे : श्रीयुत इन्फ्रास्ट्रक्चर / अनिल नाईक
यशवंतराव चव्हाणांनी सादर केलेला १९७३- ७४ चा अर्थसंकल्प काळा अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो. कारण त्यावेळी अर्थसंकल्पीय तूट ही भारत-पाकिस्तान युद्धामुळे ५५० कोटी रुपयांवर पोहोचली होती. यशवंत सिन्हा यांच्यावर अर्थसंकल्पातील कित्येक तरतुदी मागे घेण्याची वेळ आली होती. त्याला रोलबॅक अर्थसंकल्प असेही म्हटले जाते.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत
ashishpthatte@gmail.com
@AshishThatte