‘एन्रॉन’च्या भागात अजून एका पात्राचा प्रवेश होणे बाकी आहे आणि तो म्हणजे अँड्र्यू फॅस्टोव. फेब्रुवारी २००१ मध्ये केनेथ ले मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून निवृत्त झाला आणि स्किल्लिंग कार्यकारी अधिकारी झाला आणि त्याची रिक्त झालेली जागा अँड्र्यू फॅस्टोवने घेतली. वर्ष २००१ हे ते वर्ष होते जेव्हा ‘एन्रॉन’ कोलमडून पडले. याचे कारण फक्त एक नव्हते, तर बऱ्याच दिवसांपासून बाजाराची माहिती ठेवणाऱ्यांचे लक्ष त्यावर होते. इतर अनेक कारणे होती, ज्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. उद्योग चालवण्याच्या ज्या अडचणी असतात त्या तर होत्याच, पण त्यात भर पडली ती दाभोळ प्रकल्पाची. जो २००१ पर्यंत अत्यंत तोट्यात आला होता आणि हे सगळे आता लपविणे अशक्य झाले होते. एप्रिल २००१ मध्ये एका बैठकीत स्किल्लिंगने ‘वॉल स्ट्रीट’च्या एका वार्ताहराला चक्क ‘गाढव’ म्हणून संबोधले. कारण तो कंपनीच्या ताळेबंदाबद्दल अनेक प्रश्न विचारत होता. स्किल्लिंगने कित्येक वर्षांत कुठल्याच प्रश्नाला असे उत्तर दिले नव्हते. अखेरीस ऑगस्ट २००१ मध्ये स्किल्लिंगने देखील राजीनामा दिला आणि शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. केनेथ लेने परत एकदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची सूत्रे ताब्यात घेतली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. स्किल्लिंगने राजीनाम्याआधी आपले सुमारे ४.५ लाख समभाग विकून ३.३ कोटी डॉलर आपल्या गाठीला बांधले होते. त्यातच ९\११ चा हल्ला झाला. त्यामुळे कंपनीला फायदा एवढाच झाला की, त्यांचे मरण थोडेसे पुढे ढकलले गेले आणि माध्यमांमधील (कु)प्रसिद्धीपासून दूर राहिली. १६ ऑक्टोबर २००१ ला कंपनीने मागील चार वर्षातील सुधारित ताळेबंद प्रकाशित केले. २२ ऑक्टोबरला फेस्टोवने संचालक मंडळाला सांगितले की, त्याने ३ कोटी डॉलर एलजेएम या फर्मकडून मिळवले. या कंपनीची आद्याक्षरे त्याच्या बायको आणि मुलांच्या नावावर होती आणि ही विशेष कार्यासाठी बनवलेली कंपनी होती, जी ‘एन्रॉन’चे नुकसानीचे सौदे लपवण्यासाठी बनवली होती. २५ ऑक्टोबरला फेस्टोवची देखील हकालपट्टी करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा