लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: वेदान्त लिमिटेडच्या संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी पाचवा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा बुधवारी केली. अनिल अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने प्रति समभाग २०.५० रुपये लाभांश जाहीर केला असून, त्यापोटी एकूण ७,६२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
चालू आर्थिक वर्षातील पाच लाभांश मिळून कंपनीला एकंदर ३७,७०० कोटी रुपये खर्च आला. उल्लेखनीय बाब म्हणजे, वेदान्त लिमिटेडचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २३,७१० कोटी रुपये होता, जो आधीच्या वर्षातील १५,०३२ कोटी रुपयांवरून वाढला होता. त्या तुलनेत चालू वर्षात लाभांशावर कमावलेल्या नफ्याच्या दीड पटीहून अधिक खर्च कंपनीने करत आहे. विशेषत: ७७० कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ६३,१५० कोटी रुपये इतका प्रचंड कर्जभार असलेल्या आणि डिसेंबर २०२२ अखेर गंगाजळीत रोख आणि रोख समतुल्य २३,४७४ कोटी रुपये शिलकीत असणाऱ्या कंपनीने इतक्या उदारपणे लाभांश वाटणे आश्चर्यकारकच मानले जाते.
तथापि, सामान्य छोट्या भागधारकांसाठी आनंदाची बाब म्हणजे, त्यांना एका वर्षात पाच लाभांशापोटी एकत्र मिळून वार्षिक १०१.५ रुपयांची कमाई करता आली आहे. याची दुसरी बाजू म्हणजे वेदान्तचा सर्वात मोठा भागधारक म्हणजे, ६९.७ टक्के हिस्सेदारी असणाऱ्या अनिल अगरवाल यांच्या वेदान्त रिसोर्सेस या पालक कंपनीलाच या लाभांशातील सर्वाधिक वाटाही मिळणार आहे.
चालू आर्थिक वर्षातील पाचव्या प्रतिसमभाग २०.५० रुपये लाभांशासाठी भागधारकांच्या पात्रतेसाठी कंपनीने ७ एप्रिल २०२३ ही ‘रेकॉर्ड तारीख’ निश्चित केली आहे. वेदान्तचा समभाग बुधवारी मुंबई शेअर बाजारात पावणेतीन टक्क्यांनी वाढून, २८१.८० रुपये पातळीवर स्थिरावला.
‘क्रिसिल’कडून नकारात्मक शेरा
वेदान्तने अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर पतमानांकन संस्था ‘क्रिसिल’ने कंपनीचा मुदत कर्जे आणि डिबेंचर्ससाठीचा दृष्टिकोन ‘स्थिर’वरून नकारात्मक केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षात कंपनीकडील अतिरिक्त निधी, रोकड गंगाजळीचे गुणोत्तर कमी होऊन वित्तीय लवचीकतेत घट होऊ शकते, असे यातून तिने निर्देशित केले आहे. कंपनीतून रग्गड लाभांश, कर्ज दायित्व यामुळे निधीचा ओघ बाहेर जात आहे, असेही ‘क्रिसिल’ने नमूद केले आहे.