-प्रमोद पुराणिक
‘बाजारातली माणसं’ स्तंभात याअगोदर कोठारी, कम्पानी आणि कोटक अशा तीन ‘के’वर लिहिले गेले आहे. वित्तीय सेवामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची घराणेशाही असते. म्हणून निमेश कम्पानी यांचा मुलगा विशाल कम्पानी यांनी निमेश कम्पानी याची गादी सांभाळण्यास सुरुवात केली.

जे. एम. फायनान्शियल लिमिटेड या बाजारातल्या जुन्या दलाली पेढीचे विशाल कम्पानी व्यवस्थापकीय संचालक आणि बिगर कार्यकारी अध्यक्ष आहेत. आज जे एम फायनान्शियल ही संस्था वेगवेगळ्या वित्तीय सेवा पुरवठा करणारी संस्था असून त्या संस्थेला फायनान्शियल सर्व्हिसेस ‘पॉवर हाऊस’ असे म्हटले जाते. सत्तेचाळीस वर्षे वयोमानाचे विशाल कम्पानी यांचे शिक्षण मुंबईला सिडनहॅम कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमधली त्यांची मैत्रीण त्यांची पत्नी म्हणून कम्पानी परिवारात आली. ३० वर्ष मागे जायचे ठरविले तर वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या जगातल्या मोठ्या परदेशी वित्तीय संस्थांना आपल्याबरोबर घेऊन व्यवसाय वाढीच्या योजना आखण्यास सुरुवात झाली होती.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : अत्यल्प कर्जदायित्व, मूल्यांकनही आकर्षक!

डीएसपीने मेरिल लिन्चला बरोबर घेतले, संगत सोडली., ब्लॅकरॉकला बरोबर घेतले, त्यांच्याशी असलेले संबंधही पुढे संपवले. मग ब्लॅकरॉकने आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसशी घरोबा केला. कोटकने गोल्डमन सॅक्सबरोबर काही वर्ष संसार चालण्याचा प्रयत्न केला, तर जेएमने मॉर्गन स्टॅन्लेला बरोबर घेतले. परंतु काही वर्षानंतर प्रत्येकाला या ना त्या कारणाने जुनी नाती तोडावी लागली. मॉर्गन स्टॅन्ले आणि जेएम फायनान्शियल या दोन संस्थांनी जेव्हा सहकार्याचा करार केला तेव्हा निमेश कम्पानी यांनी विशालवर जबाबदारी टाकली. मॉर्गन स्टॅन्लेने विशालला न्यूर्याकला यायला सांगितले. त्या ठिकाणी विशाल कम्पानी यांना अत्यंत चांगले प्रशिक्षण मिळाले. लंडन बिझनेस स्कूलमधून मास्टर्स पदवी मिळवणे आणि प्रत्यक्ष मॉर्गन स्टॅन्लेकडे व्यावहारिक अनुभव शिकणे, दोन्हीत अंतर निश्चित होते. त्याचबरोबर वडील निमेश कम्पानी यांच्या सान्निध्यात असल्यामुळे आपले वडील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी मग ते टाटा असतील, धीरूभाई अंबानी असतील, बिर्ला असतील यांच्याशी किती सहजपणे बोलतात, सखोल अभ्यास करतात, त्यानंतर मग उद्योग समूहाला एखादी योजना आखून देतात. हे सर्व विशाल कम्पानी यांना हळूहळू समजायला लागले. आणि मग २०१६ ला निमेश कम्पानी ७० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली आणि विशाल कम्पानी यांना नेतृत्व स्वीकारावे लागले.

विशाल कम्पानी यांनी जबाबदारी स्वीकारली आणि एका मागोमाग एक आव्हानांना तोंड देण्यास सुरुवात झाली. नोटबंदी, आयएलएफएसने बाजारात निर्माण केलेला गोंधळ, मग त्यांच्यापाठोपाठ कोविडचे संकट अशी एकामागोमाग एक संकटे येत गेली. परंतु संकटांना सामोरे जात असतानाच व्यक्तीच्या अंगात संकटांशी लढण्याची ताकद येऊ लागते.

आणखी वाचा-लोहपोलाद क्षेत्र: चढउतार, व्यवसाय संधी आणि गुंतवणूक

पन्नास वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतंत्रपणे काम करणारे फार थोडे या बाजारात कार्यरत आहेत आणि त्यामध्ये विशाल कम्पानी यांचे नाव घ्यावेच लागते. वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा कंपन्यांना देणे, त्यांच्याकडून चांगल्याप्रकारे फी उत्पन्न मिळवणे, त्यामध्ये विलीनीकरण योजना, विलगीकरण योजना, एखाद्या कंपनीकडून एखादा व्यवसाय विभाग वेगळा करणे, एल ॲण्ड टीमधून सीमेंट व्यवसाय बाजूला काढणे आणि तो बिर्लाना देणे. त्यातून मग अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी निर्माण होणे, अनेक कंपन्यांच्या शेअर्स विक्रीत भाग घेऊन त्या कंपन्यांची शेअर्स विक्री यशस्वी करून दाखविणे. म्युच्युअल फंडासाठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी सुरू करणे कंपन्यासाठी कर्जेरोख्यांद्वारे पैशाची उभारणी करणे, कंपन्यांच्या ठेव योजना यशस्वीपणे राबविणे, एखाद्या कंपनीला भांडवल बाजारात प्रवेश करायचा असेल तर त्याचे नियोजन करणे अशा प्रकारची विविध कामे एकाच वेळी जेएममध्ये चालू असतात. आणि विशाल कम्पानी सहजपणे ही कामे हाताळत असतात. ही कामे करीत असताना काही वेळा चुका होतात. अपयश सहन करायला लागते पण ही तारेवरची कसरत असते. निमेश कम्पानी यांच्या गादीला वारस निर्माण झालेला असतो.

आणखी वाचा-‘बीटा’ संकल्पनेचा जन्मदाता : विल्यम शार्प

या स्तंभात (अर्थ वृत्तान्त, २० मार्च २०२३ ) निमेश कम्पानी यांच्यावर ‘वारसा भांडवल उभारणीचा’ या मथळ्याखालील लेखात त्यांचा व्यवसायातला प्रवास थोडक्यात मांडला होता. निमेश कम्पानी यांचा मुलगा विशाल कम्पानी परदेशात उच्च शिक्षण घेऊन त्यांचा वारसा सांभाळू लागला आहे. त्यांचाही कामाचा आढावा घेण्याचा विचार आहे असेही त्यावेळी लिहिले होते. राजकारणात जर घराणेशाही चालते तर वित्तीय सेवा क्षेत्रात वर्षानुवर्षांची घराणेशाही असते आणि तिचा भांडवल बाजाराला उपयोग होतो. अशा प्रकारच्या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या परदेशी संस्था त्यांचा तब्बल १५०, २०० वर्षाचा देखील इतिहास उपलब्ध आहे. आपल्याकडेसुद्धा असे घडून यावे ही अपेक्षा.