अमेरिकेचे जगात आर्थिक नेतृत्व निर्माण करणारा शिल्पकार असे नाव म्हणजे वॉल्टर रिस्टन म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. पेशाने ते तसे बँकरच, पण त्या काळात प्रचंड व्यावसायिक प्रभाव असणारे व्यक्तिमत्त्व होते. कनेक्टिकट मिडल टाउन या ठिकाणी ३ ऑगस्ट १९१९ ला वॉल्टर यांचा जन्म झाला. तर १९ जानेवारी २००५ या दिवशी मॅनहॅटन या ठिकाणी ते मृत्यू पावले. पुढील महिन्यात त्यांच्या मृत्यूला १८ वर्षे पूर्ण होतील. जसे हेन्री किसिंजर पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. चार्ली मुंगर पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अमेरिकी अर्थकारणात वॉल्टर रिस्टन नव्याने निर्माण होऊ शकणार नाही.
या माणसाने त्याच्या संपूर्ण जीवनभरात एवढे प्रचंड काम केले आहे, की यावर फक्त एक लेख लिहिणे अत्यंत कठीण आहे. तरी जागेची मर्यादा लक्षात घेऊन आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे असे की, या स्तंभाचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या प्रभावशाली माणसांची आणखी माहिती मिळवण्याची उत्सुकता निर्माण करणे आहे आणि तो कार्यभाग या लेखातून साध्य होईल अशी आशा आहे. या माणसाने काय केले तर बँकिंग व्यवसायात एटीएमचा वापर आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु उद्याची गरज विचारात घेऊन या माणसाने बँकिंग व्यवसायात एटीएमचा वापर सुरू केला. १९६७ ते १९८४ या काळात वॉल्टर रिस्टन यांची सिटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारकीर्द राहिली. सिटी बँक आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट या त्या काळातील अभिनव साधनेचे निर्मातेही वॉल्टरच होते. क्रेडिट कार्ड व्यवसाय आज जगात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुन्हा बँकिंग व्यवसायातील ही भविष्यातील मोठी गरज असेल, हे सर्वात अगोदर त्यांनाच समजले होते. १९७० सालात न्यूयॉर्क शहराला आर्थिक संकटातून वाचवणारे वॉल्टरच होते.
हेही वाचा – पिरामल फाऊंडेशन- समावेशकता व सक्षमीकरण तळागाळापर्यंत
एका देशातून दुसऱ्या देशात पैसा सहजपणे फिरला पाहिजे. कोणत्याही देशाचे जगातल्या पैशांवर नियंत्रण असू नये. उलट राजकारणी लोकांचे, राजकारणाचे नियंत्रण हे पैशाकडून झाले पाहिजे. पैशांची ताकद राजकारणी लोकांपेक्षा जास्त असली पाहिजे, अशा विचारसरणीचा हा माणूस होता. त्यांनी जी तीन पुस्तके लिहिली, त्यात या मतांचाच पुरस्कार त्यांनी केला आहे. हे असे काही घडू शकेल की नाही, माहीत नाही. वॉल्टर यांच्या विचाराच्या बाजूने आणि विरोधातही मतमतांतरे असू शकतील. तूर्तास हा विषय आपण बाजूला ठेवू.
वॉल्टर यांनी काय केले तर त्याने जगाच्या अर्थकारणात डॉलरला केंद्रस्थानी आणले. वॉल्टरने सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे एक आर्थिक साधन अशा प्रकारे वापरले की, त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना आपले डॉलर एका देशातून दुसऱ्या देशात नेणे किंवा आणणे फार सोपे झाले. यासाठी कोणतेही नियोजन करण्याची गरज पडली नाही, असे अनेकांना वाटेल. १९७१ मध्ये त्या वेळचे अमेरिकी अध्यक्ष निक्सन यांनी जगाला फार मोठा आर्थिक धक्का दिला. सोने आणि डॉलर या दोघांमधले आर्थिक नाते त्यांनी नष्ट केले. त्याअगोदर आंतरराष्ट्रीय व्यापारात ब्रिटिश पौंड महत्त्वाचा होता.
आपण स्वप्न पाहत आहोत की, रुपया डॉलरला जगातल्या आर्थिक बाजारपेठेतून बाजूला करेल. म्हणजे २०३० पर्यंत रुपया डॉलरची जागा घेईल. अशी स्वप्ने बघणे चुकीचे नाही, परंतु स्वप्नातले सत्यात आणण्यासाठी नेतृत्वस्थानी असणाऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते.
वॉल्टर यांची सुरुवात १९४६ ला फर्स्ट नॅशनल सिटी बँकेतील नोकरीने झाली. परंतु १९८४ ला ते जेव्हा निवृत्त झाले, त्या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी बँकिंग उद्योग शिखरावर नेला होता. वॉल्टर सिटी बँकेचे आणि सिटी बँकेची होल्डिंग कंपनी – सिटी कॉर्प या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष होते. १९९८ ला सिटी कॉर्प ट्रॅव्हलर्समध्ये विलीन करण्यात आली. ८४ अब्ज डॉलरचा हा व्यवहार झाला. त्यानंतर सिटी ग्रुप असे नामकरण झाले.
फेडरल रिझर्व्हच्या एका माजी अध्यक्षाची अशी प्रतिक्रिया होती की, आमच्यापेक्षाही जास्त सिटी कॉर्पचा बँकिंग जगतावर प्रभाव आहे. ‘बँकेला भांडवलाची गरजच नाही,’ अशी अतिशय धाडसी विचारसरणी वॉल्टर यांची होती. जगभरात ९१ देशांत त्याने सिटी बँकेच्या शाखा उघडल्या. ते म्हणत, बँकेचे व्यवस्थापन जर फालतू माणसाच्या हातात असेल तर त्या बँकेत कितीही भांडवल ओतले तरीही ती बँक वाचणार नाही. कृपया या वाक्याचा संदर्भ कोणत्याही भारतीय बँकेशी जोडू नये.
हेही वाचा – सरत्या वर्षाचे बाजाररंग!
आधुनिक ग्राहक चळवळीचा पाया ज्याने घातला त्या राल्फ नडेर यांनी १९७३ साली ४०६ पानांचा एक शोध-अहवाल प्रसिद्ध केला. सिटी बँकेने ग्राहकांना फसवले, कर्मचाऱ्यांना अपुरा पगार दिला, असा त्यायोगे थेट बँकेवरच हल्ला केला गेला होता. नडेर यांच्या या हल्ल्याला वॉल्टर घाबरले नाहीत. उलट त्यांनी नडेर यांच्यावर अत्यंत बेजबाबदार अशी टीका करीत, त्यांचा अहवाल म्हणजे वस्तुस्थितीचे चुकीचे विश्लेषण करणारा विपर्यास, असा प्रतिहल्ला केला.
सिटी बँकेने आयुष्यात खूप मोठे चढ-उतार अनुभवले. एका मोठ्या बँकेचा अध्यक्ष असलेला हा माणूस इतका साधा होता की, एका हॉलमध्ये त्यांचे भाषण चालू होते आणि त्या हॉलची वातानुकूलन यंत्रणा बिघडली. हा माणूस स्क्रू-डायव्हर हातात घेऊन एसी यंत्र दुरुस्त करण्यासाठी जमिनीवर बसला. या माणसाच्या कारकिर्दीत सिटी बँकेने सगळे निर्णय चांगले घेतले असे कोणी म्हणणार नाही. परंतु त्याने अमेरिकेला मोठे केले आणि सिटी बँकेला मोठे केले. बाजारात अर्थकारणातली माणसे अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाचे काम करून जातात. औद्योगिकीकरणाची चाके व्यवस्थित फिरण्यासाठी पैशांचे वंगण आवश्यक असते. ते वित्तसंस्था पुरवतात. यासाठी बाजाराच्या घडणीत बँका महत्त्वाच्या आहेत.