आशीष ठाकूर
उद्या आपण देशाच्या स्वातंत्र्याची गौरवशाली ७६ वर्ष पूर्ण करत असताना गत वर्षांचा आढावा घेता, आपल्याबरोबर स्वतंत्र झालेले आपले शेजारील देश हे दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहेत तर आपली वाटचाल ही येणाऱ्या पाच ते सात वर्षात आर्थिक विकासाच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच देशांच्या पंक्तीत बसण्याच्या दिशेने सुरू आहे. आपल्या शेजाऱ्यांची-पाकिस्तान, श्रीलंका यांच्या अर्थव्यवस्था या ‘शून्याकडून मोठया शून्याकडे’ जात असताना, आपली अर्थव्यवस्था ही २०२५ पर्यंत ‘पाच ट्रिलीयन डॉलर’चा मैलाचा दगड साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे. हाच स्वातंत्र्याचा जल्लोष आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स- ६५,३२२.६५ / निफ्टी- १९,४२८.३०
गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकावरील चालू असलेल्या घसरणीला प्रथम १९,५०० आणि द्वितीय आधार १९,२०० हा असेल. त्या प्रमाणे निफ्टी निर्देशांकाने ३ ऑगस्टला १९,२९६ चा आधार घेत सुधारणा दाखवली खरी, पण ती अल्पजीवी ठरली. सरलेल्या सप्ताहातील निफ्टी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद १९,४२८ वर झाला. २० मार्चच्या १६,८२८ च्या नीचांकापासून अवघ्या पाच महिन्यांत ३,००० अंशाहून अधिक अशी सुधारणा झाल्याने निफ्टी निर्देशांकाला थोडी कालानुरूप विश्रांतीची गरज आहे. या घसरणीत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १९,००० ते १८,८०० चा स्तर राखल्यास आणि या स्तरादरम्यान पायाभरणी केल्यास, निफ्टी निर्देशांकाचे २०,५५० हे वरचे लक्ष्य दृष्टिपथात येईल.
दीर्घमुदतीच्या तेजीची गृहीतके : भाग – २
वर्ष २००३ ते २००७ दरम्यानचा तेजीचा कालावधी: १९९२ ची हर्षद मेहताची, २००० ची केतन पारेखची तेजी ही कलंकित आणि गडबड, घोटाळयांतून साकारली गेली होती. पण २००३ पासून सुरू झालेली तेजी ही अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक घटनांच्या आधारावर होती. भारतात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका होऊन अर्थतज्ज्ञ असलेले मनमोहन सिंग पंतप्रधान झालेले (यूपीए -१), तर त्या आधी १९८९-९०साली भारत दिवाळखोरीच्या उंबरठयावर असताना, लोकसभेच्या निवडणुका होऊन नरसिंह राव पंतप्रधान आणि मनमोहनसिंग अर्थमंत्री झाले. त्यांनी विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसवत, अर्थव्यवस्थेत उदारीकरणाचे उद्योग-व्यापार पूरक, चालना देणारी धोरणे अवलंबली. अर्थव्यवस्था खंक अवस्थेतून सुस्थितीत आणली. अशा व्यक्तीकडेच देशाची सूत्रं आल्यावर उद्योग-व्यापार जगत निश्चिंत होते. त्यात २००० साली अमेरिकेतील ‘ट्वीन टॉवर’वरील दहशतवादी हल्ल्यामुळे दहशतवादाची प्रत्यक्ष झळ अमेरिकेने अनुभवल्यामुळे भारताच्या व्यथा, वेदनांची जाणीव होऊन अमेरिकेचा भारतविषयक दृष्टिकोन सकारात्मक होण्यास सुरुवात झाली. या पोषक वातावरणाचा प्रत्यक्ष लाभार्थी हे व्यापार उद्योग क्षेत्र होते. त्यात अमेरिकी मध्यवर्ती बँक – ‘फेड’चे प्रमुख ॲलन ग्रीनस्पॅन यांचे प्रथम सवलतीच्या दरातील व त्यानंतर शून्य व्याजदरावरील कर्जपुरवठ्याचे धोरण आले. ज्यामुळे मुबलक स्वरूपात अर्थव्यवस्थेत पैसा उपलब्ध झाला जो गुंतवणूकदार संस्थांनी अमेरिकेत गृहकर्ज योजनेत व परदेशी गुंतवणूकदार संस्थानी भारताच्या भांडवली बाजारात गुंतवण्यास सुरुवात केली. आता प्रचलित असलेली म्युच्युअल फंडाची ‘एसआयपी योजना’ तेव्हा बाळसे धरत होती. आता परदेशी गुंतवणूकदार संस्था, भारतीय म्युच्युअल फंड व बाजारातील बडे गुंतवणूकदार (एचएनआय) असा तिघांचा बाजारात ‘त्रिवेणी संगम’ होत निर्देशांक पाच वर्षात सातपट झाला आहे. खरे वाटत नाही ना! पुढील लेखात या संबंधाने विस्तृत आढावा घेऊया (क्रमशः)
शिंपल्यातील मोती
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
(शुक्रवार, ११ ऑगस्टचा बंद भाव – ३२.९५ रु.)
अनुत्पादित कर्ज नीचांकी स्तरावर, भरीव असे उत्पन्न, त्यात आकर्षक नफा अशी सर्व किमया सरकारी बँका करत असल्याने ‘सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.
सेन्ट्रल बँकेचा दोन आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेता, बँकेचे उत्पन्न ६,३५७ कोटींवरून ८,१८४ कोटींवर, निव्वळ नफा २३५ वरून ४१८ कोटी रुपये, ढोबळ अनुत्पादित मालमत्तांचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण १४.९० टक्क्यांवरून, ४.९५ टक्के इतके खाली आले, तर नक्त अनुत्पादित कर्ज ३.९३ टक्क्यांवरून १.७५ टक्क्यांवर घसरल्याचे दिसते. जे बँकेच्या प्रगतीचे दिशानिर्देशन करत आहे.
भांडवली बाजारातील सेन्ट्रल बँकेच्या समभागाची वाटचाल पाहता तो २६ ते ३३ रुपयांच्या परिघात वाटचाल करत आहे. समभाग सातत्याने ३३ रुपयांच्यावर पाच दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य ३७ ते ४२ रुपये तर, दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य ५३ ते ६० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला २४ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर वाचकांना सदिच्छा स्वरूपात ‘शिंपल्यातील मोती’ सदरात सुचवलेले, दीर्घमुदतीची वरची लक्ष्य साध्य केलेले, तर काही प्रसंगी शिफारस केलेल्या किमतीपासून दुप्पट झालेल्या समभागांचा आढावा घेऊया. वाचकांना ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष पूर्ततेची’ भेट स्वरूपात तो अर्पण करत आहे. ७ नोव्हेंबरला ‘आनंद राठी वेल्थ लिमिटेड’ ७१२ रुपयांना सुचवलेला समभाग, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १,४३७ रुपये (११ ऑगस्टचा बंद भाव) आहे. २३ जानेवारीचा ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ २१८ रुपयांवरून ५०२ रुपये, तर २६ फेब्रुवारीच्या लेखातील ‘बॉम्बे स्टाँक एक्सचेंज’ ४३९ रुपयांवरून ८९४ रुपये झाला आहे.
महत्त्वाची सूचना: सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या समभागात लेखकाची स्वतःची,अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१) डिविज लँबोरेटरीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल-सोमवार,१४ ऑगस्ट
११ ऑगस्टचा बंद भाव – ३,६७९.१५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,७०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल:- समभागाकडून ३,७०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३,९२० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,१०० रुपये.
ब) निराशादायक निकाल :- ३,७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,४५० रुपयांपर्यंत घसरण.
२) आयटीसी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार,१४ ऑगस्ट
११ ऑगस्टचा बंद भाव- ४४८.७५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४६० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४६० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ४७५ रुपये,द्वितीय लक्ष्य ५०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ४६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४३० रुपयांपर्यंत घसरण.
३) जिलेट इंडिया लिमिटेड.
तिमाही वित्तीय निकाल-मंगळवार,२९ ऑगस्ट
११ ऑगस्टचा बंद भाव – ५,४९१ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५,४५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५,४५० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ५,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,९५० रुपये.
ब) निराशादायक निकाल :- ५,४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५,३०० रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:– शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.